India vs South Africa: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली बुधवारी पार्ल येथील बोलंड पार्क येथे खेळल्या गेलेल्या दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळला. सात वर्षांहून अधिक काळानंतर कर्णधारपदाच्या जबाबदारीशिवाय तो एखादा सामना खेळला. या नव्या रूपात खेळताना कोहलीने ५१ धावांची संयमी खेळी केली. पण अर्धशतकानंतर त्याला बाद करण्यात आफ्रिकेला यश आले. त्यामुळे त्याच्या ७१ व्या शतकासाठी फॅन्सना आणखी वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज अॅलन डोनाल्डने माजी भारतीय कर्णधाराच्या फलंदाजीच्या फॉर्मबद्दल सडेतोड मत व्यक्त केले. विराट कोहली हा अजिंक्य नाही, असं डोनाल्ड म्हणाला आहे.
कोहलीने याआधी पार्ल येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ७९ धावांची खेळी केली होती. तशाच प्रकारची खेळी त्याने कालच्या वन डे सामन्यात खेळला. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, अॅलन डोनाल्ड म्हणाला की विराट फलंदाजी करताना तांत्रिकदृष्ट्या गोलंदाजांना कळला की नाही ते सांगता येणार नाही. पण आफ्रिकन फलंदाजांनी त्याला धावा करून दिल्या नाहीत हे नक्की खरं आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथचं उदाहरण देत डोनाल्ड पुढे म्हणाला की, प्रत्येक फलंदाजाच्या कारकिर्दीत अशी वेळ येते जेव्हा त्याच्याकडून अपेक्षित कामगिरी होत नाही. त्याला धावा करणं जड जातं. पण मला खात्री आहे की विराट कोहली लवकरच त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये परतेल.
"विराट हा खेळाच्या बाबतीत अजिंक्य आहे का? अजिबातच नाही!! महान खेळाडूही काही वेळा खराब कामगिरी करतात. कारण खेळ हा कोणातही भेदभाव करत नाही. तो सगळ्यांसाठी सारखाच असतो. स्टीव्ह स्मिथचं उदाहरण पाहा. बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर स्टीव्ह स्मिथने पुनरागमन केलं. पण त्याला त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ करणं जमत नाहीये. त्याचप्रमाणे विराटचा देखील सध्या कसोटीचा काळ सुरू आहे. मला विराटच्या खेळाचा दर्जा माहिती आहे. मला खात्री आहे की तो लवकरच फॉर्ममध्ये परतेल", असं डोनाल्ड म्हणाला.