India vs South Africa, 1st ODI Live Updates : दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलताना पहिल्या वन डे सामन्यात भारतासमोर तगडे आव्हान उभे केले. पहिल्या तीन विकेट्स ६८ धावांवर पडल्यानंतर कर्णधार टेम्बा बवुमा ( Temba Bavuma ) व रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( Rassie van der Dussen) यांनी चौथ्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी केली. बवुमानं ६ वर्षांनंतर वन डे क्रिकेटमध्ये शतक पूर्ण करताना मोठा विक्रम केला, तर ड्यूसेननंही ८३ चेंडूंत शतक पूर्ण केले. घरच्या मैदानावर भारताविरुद्ध एकाच वन डे सामन्यात आफ्रिकेच्या दोन फलंदाजांनी शतक झळकावण्याची ही तिसरी वेळ ठरली. यापूर्वी २०१३मध्ये क्विंटन डी कॉक व हाशिम आमला यांनी डर्बन येथे, तर त्याचवर्षी डी कॉक व एबी डिव्हिलियर्स यांनी सेंच्युरियन येथे शतकी खेळी केली होती.
१५व्या षटकानंतर घेतलेल्या ड्रिंक्सब्रेकनंतर आर अश्विननं आफ्रिकेला मोठा धक्का दिला. त्यानं क्विंटन डी कॉकचा त्रिफळा उडवला. अश्विननं टाकलेल्या चेंडूनं कमी उसळी घेतली अन् ते क्विंटन हेरू शकला नाही. त्यानं ४१ चेंडूंत २७ धावा केल्या. वेंकटेश अय्यरनं पदार्पणाच्या सामन्यात भारताला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. त्यानं एडन मार्करामला ( ४) धावबाद केले. बवुमा आणि रॅसी व्हॅन डेर ड्युसेन यांनी आफ्रिकेचा डाव सावरलाही अन् धावांचा वेगही वाढवला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकही पूर्ण केले. चार वर्षांनी भारतीय संघात कमबॅक करणाऱ्या आर अश्विननं प्रभावी गोलंदाजी केली. बवुमा व डेर ड्युसेन यांनी आफ्रिकेला ४० षटकांत २१० धावांपर्यंत मजल मारून दिली.
ड्यूसेननंही ८३ चेंडूंत शतक पूर्ण केले. त्याचेही हे वन डेतील दुसरे शतक ठरले. ४८व्या षटकात जसप्रीत बुमराहला ही जोडी तोडण्यात यश मिळालं. टेम्बा बवुमा १४३ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीनं ११० धावांवर लोकेश राहुलच्या हाती झेल देऊन माघारी परतला. बवुमानं चौथ्या विकेटसाठी ड्यूसेनसह २०४ धावांची भागीदारी केली. भारताविरुद्धची आफ्रिकन खेळाडूंची ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी २००० साली हर्षल गिब्स व गॅरी कर्स्टन यांनी २३५ धावा जोडल्या होत्या. या जोडीनं हाशिम आमला व डी कॉक यांनी २०१३ मध्ये नोंदवलेल्या १९४ धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडला. ड्यूसेन ९६ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारासह १२९ धावांवर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेनं ४ बाद २९६ धावांचा डोंगर उभा केला.