India captain KL Rahul press conference : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेचा पराभव विसरून भारतीय संघ उद्यापासून सुरू होणाऱ्या वन डे मालिकेसाठी सज्ज झाली आहे. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) अनुपस्थितीत लोकेश राहुलकडे ( KL Rahul) वन डे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे आणि जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) उप कर्णधाराच्या भूमिकेत असणार आहे. वन डे संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकल्यानंतर विराट कोहलीची ( Virat Kohli) ही पहिलीच मर्यादित षटकांची मालिका आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीवरही साऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. दरम्यान, लोकेश राहुलनं या मालिकेत सलामीला आपणच खेळणार असल्याचे मंगळवारी जाहीर केले. पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत लोकेश राहुलनं टीम इंडियाची रणनीती सांगितली.
या मालिकेत सीनियर खेळाडू शिखर धवन याच्या कामगिरीकडेही साऱ्यांचे लक्ष असणार आहे. टीम इंडियानं मालिकेसाठी निवडलेल्या संघात धवन, लोकेश यांच्यासह ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) हा तिसरा सलामीवीर म्हणून पर्याय आहे. पण, लोकेश राहुलनं आज पत्रकार परिषदेत सांगितले की,'मागील काही सामन्यांत मी ४,५ क्रमांकावर फलंदाजी केली, परंतु आता रोहितच्या अनुपस्थितीत मी या मालिकेत सलामीला खेळणार आहे.' राहुलच्या या विधानानं दुसरा सलामीवीर म्हणून धवन किंवा ऋतुराज यांच्यापैकी एकालाच संधी मिळेल, हे निश्चित आहे. लोकेश पुढे म्हणाला,''शिखर धवन हा सीनियर खेळाडू आहे आणि त्याच्याकडे अनुभव आहे. तो चांगल्या लयात दिसतोय आणि आशा करतो की तो भारताला चांगली सुरुवात करून देईल.''
''महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यासारख्या दिग्गज कर्णधारांच्या नेतृत्वाखाली मला खेळण्याची संधी मिळालीय. त्यांच्याकडून जे काही शिकायला मिळाले, त्याचा वापर मी माझ्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात करण्याचा प्रयत्न करणार आहे. कदाचित माझ्याकडून चुका होतील, परंतु मी त्यातून शिकण्याचा आणि सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन,''असेही तो म्हणाला.
उद्याच्या सामन्यात वेंकटेश अय्यरचा सहावा गोलंदाज म्हणून समावेश केला जाईल असे संकेत राहुलनं दिले. तो म्हणाला, वेंकटेश अय्यर हा उदयोन्मुख खेळाडू आहे. जलदगती गोलंदाज अष्टपैलू खेळाडू संघात असणे नेहमीच महत्त्वाचे आहे. त्याच्यासाठी ही चांगली संधी आहे. नेट्समध्येही त्यानं चांगला सराव केला आहे.
भारतीय संघ - लोकेश राहुल (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रिषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जयंत यादव, नवदीप सैनी
पहिल्या वन डे साठीचा संभाव्य संघ - लोकेश राहुल, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर
Web Title: IND vs SA, 1st ODI Live Updates : KL Rahul confirms he'll opening the innings in the ODI series against South Africa, know team India Probable Playing XI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.