India vs South Africa, 1st ODI Live Updates : कर्णधारपद सोडल्यानंतर फक्त फलंदाज म्हणून प्रथमच मैदानावर उतरलेल्या विराट कोहलीनं ( Virat Kohli) मोठ्या विक्रमाची नोंद केली. दक्षिण आफ्रिकेच्या ४ बाद २९६ धावांचा पाठलाग करताना लोकेश राहुल व शिखर धवन यांनी पहिल्या विकेटसाठी ४६ धावा जोडल्या. एडन मार्करामनं पहिला धक्का देताना लोकेशला १२ धावांवर माघारी पाठवलं. त्यानंतर विराटनं दुसऱ्या विकेटसाठी धवनसह चांगली भागीदारी केली. विराटनं ९वी धाव घेताच सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला. त्यानंतर धवननं अर्धशतक पूर्ण केले.
दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलताना पहिल्या वन डे सामन्यात भारतासमोर तगडे आव्हान उभे केले. पहिल्या तीन विकेट्स ६८ धावांवर पडल्यानंतर कर्णधार टेम्बा बवुमा ( Temba Bavuma ) व रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( Rassie van der Dussen) यांनी चौथ्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी केली. बवुमानं ६ वर्षांनंतर वन डे क्रिकेटमध्ये शतक पूर्ण करताना मोठा विक्रम केला, तर ड्यूसेननंही ८३ चेंडूंत शतक पूर्ण केले. बवुमानं १३३ चेंडूंत शतक पूर्ण केले. वन डे तील त्याचे हे दुसरे शतक ठरले. २०१६मध्ये त्यानं आयर्लंडविरुद्ध पहिले शतक झळकावले होते. टेम्बा बवुमा १४३ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीनं ११० धावांवर लोकेश राहुलच्या हाती झेल देऊन माघारी परतला.
बवुमानं चौथ्या विकेटसाठी ड्यूसेनसह २०४ धावांची भागीदारी केली. भारताविरुद्धची आफ्रिकन खेळाडूंची ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी २००० साली हर्षल गिब्स व गॅरी कर्स्टन यांनी २३५ धावा जोडल्या होत्या. या जोडीनं हाशिम आमला व डी कॉक यांनी २०१३ मध्ये नोंदवलेल्या १९४ धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडला. ड्यूसेन ९६ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारासह १२९ धावांवर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेनं ४ बाद २९६ धावांचा डोंगर उभा केला. घरच्या मैदानावर भारताविरुद्ध एकाच वन डे सामन्यात आफ्रिकेच्या दोन फलंदाजांनी शतक झळकावण्याची ही तिसरी वेळ ठरली. यापूर्वी २०१३मध्ये क्विंटन डी कॉक व हाशिम आमला यांनी डर्बन येथे, तर त्याचवर्षी डी कॉक व एबी डिव्हिलियर्स यांनी सेंच्युरियन येथे शतकी खेळी केली होती.
परदेशात वन डे सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजाचा विक्रम विराटच्या नावावर नोंदवला गेला आहे. त्यानं ९वी धाव घेताच सचिन तेंडुलकरला मागे टाकले. आता ५०६६* धावांसह विराट अव्वल स्थानावर आहे. सचिनच्या नावावर ५०६५ धावा आहेत. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी ( ४५२०) व राहुल द्रविड ( ३९९८) यांचा क्रमांक येतो. मागील ९ वर्षांपासून हा विक्रम सचिनच्या नावावर होता.