India vs South Africa, 1st ODI Live Updates : पहिल्या वन डे सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत लोकेश राहुलनं ( KL Rahul) वेंकटेश अय्यरच्या ( Venkatesh Iyer) नावाचा उल्लेख करताना तो सहावा गोलंदाज असे सांगितले होते. पण, आजच्या सामन्यात त्याच्याकडून राहुलनं एकही षटक फेकून घेतलं नाही आणि त्यामुळे चाहते नाराज दिसले. संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून स्थान मिळालेल्या वेंकटेशला एकही षटक न दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तो अष्टपैलू खेळाडू आहे की फक्त फलंदाज, असाही सवाल केला जात आहे.
भारताच्या पाचही प्रमुख गोलंदाजांना मधल्या षटकांत विकेट मिळवता आली नाही. टेम्बा बवुमा व रॅसी व्हॅन डेर ड्युसेन या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी २०४ धावांची भागीदारी करताना भारतासमोर ४ बाद २९६ धावांचं आव्हान उभं केलं. टेम्बा बवुमा १४३ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीनं ११० धावांवर लोकेश राहुलच्या हाती झेल देऊन माघारी परतला. ड्यूसेन ९६ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारासह १२९ धावांवर नाबाद राहिला. वेंकटेशनं पदार्पणाच्या या सामन्यात क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी करताना एडन मार्करामला धावबाद केले.
लोकेश राहुलन वेंकटेशला एकही षटक न दिल्यानं माजी सलामीवीर गौतम गंभीर यानं सवाल उपस्थित केला. वेंकटेश अय्यरच्या रुपानं गोलंदाजीचा सहावा पर्याय उपलब्ध होता. त्याला गोलंदाजी द्यायला हवी होती, असं मत गंभीरनं समालोचन करताना व्यक्त केलं. भारताकडून जसप्रीत बुमराहनं १० षटकांत ४८ धावांत २ विकेट्स घेतल्या. भुवनेश्वर कुमारनं १० षटकांत ६४ धावा, शार्दूल ठाकूरनं १० षटकांत ७२ धावा आणि युजवेंद्र चहलनं ५३ धावा दिल्या. आर अश्विननं ५३ धावा देताना १ विकेट घेतली. वेंकटेश अय्यरनं विजय हजारे ट्रॉफीत ९ विकेट्स घेतल्या आहेत.