India vs South Africa, 1st ODI Live Updates : कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर प्रथमच मैदानावर उतरलेल्या विराट कोहलीच्या ( Virat Kohli) आक्रमकतेत तसूभरही कमी जाणवली नाही. लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली खेळताना विराट त्याच जुन्या आक्रमक अंदाजात दिसला. विराटनं क्षेत्ररक्षण करताना दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा ( Temba Bavuma) याच्याशी पंगा घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
टेम्बा बवुमा व विराट यांच्यात नेमकं काय घडलं?आफ्रिकेच्या डावातील ३६व्या षटकात युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर ही घटना घडली. त्याच्या चौथ्या चेंडूवर बवुमानं कव्हर्सच्या दिशेनं फटका मारला आणि तेथे विराट उभा होता. विराटनं त्वरित चेंडू उचलला आणि यष्टिरक्षक रिषभ पंतच्या दिशेनं फेकला. विराटनं फेकलेला चेंडू बवुमाच्या अगदी जवळून गेला आणि तो जखमी होण्यापासून थोडक्यात वाचला. त्यानंतर बवुमा व विराट यांच्यात शाब्दित बाचाबाची झाली.
दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या तीन विकेट्स ६८ धावांवर पडल्यानंतर कर्णधार टेम्बा बवुमा ( Temba Bavuma ) व रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( Rassie van der Dussen) यांनी चौथ्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी केली. टेम्बा बवुमा १४३ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीनं ११० धावांवर लोकेश राहुलच्या हाती झेल देऊन माघारी परतला. बवुमानं चौथ्या विकेटसाठी ड्यूसेनसह २०४ धावांची भागीदारी केली. भारताविरुद्धची आफ्रिकन खेळाडूंची ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी २००० साली हर्षल गिब्स व गॅरी कर्स्टन यांनी २३५ धावा जोडल्या होत्या. ड्यूसेन ९६ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारासह १२९ धावांवर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेनं ४ बाद २९६ धावांचा डोंगर उभा केला.