Shikhar Dhawan, IND vs SA 1st ODI : सातत्यपूर्ण कामगिरीशी झगडणाऱ्या शिखर धवननं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यातून पुनरागमन केलं. जुलै २०२१नंतर प्रथमच वन डे सामना खेळणाऱ्या धवननं ८४ चेंडूंत ७९ धावांची खेळी करताना विराट कोहलीसह दुसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
विजय हजारे ट्रॉफीत धवनला चांगली कामगिरी करता आली नव्हती, तर ऋतुराज गायकवाडनं ५ सामन्यांत ४ शतकं झळकावली होती. पण, आफ्रिका दौऱ्यावरील वन डे सामन्यात धवनची निवड झाली आणि पहिल्या सामन्यात कर्णधार लोकेश राहुलनं अनुभवी धवनला संधी देण्याचा निर्णय घेतला. धवननं ही संधी साधली आणि दमदार खेळ केला. त्यानं ७९ धावांची खेळी करून ऑस्ट्रेलियाचा दिग्गज मॅथ्यू हेडन, इंग्लंडचा जो रूट आणि न्यूझीलंडचा केन विलियम्सन यांना मागे टाकून वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या शर्यतीत पुढे गेला आहे.
२०१३पासून भारताच्या वन डे संघाचा नियमित सदस्य असलेल्या धवननं १४५ वन डे सामन्यांत ६१०५ धावा केल्या होत्या. कालच्या वन डेतील ७९ धावांमुळे त्याच्या एकूण धावा ६१८४ इतक्या झाल्या. हेडनच्या नावावर १६१ सामन्यात ६१३३ धावा आणि विलियम्सनच्या नावावर ६१७३ धावा आहेतत. जो रुटच्या नावावर ६१०९ धावा आहेत. वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये धवन ५८ स्थानावर आहे. त्याला अव्वल ५० मध्ये येण्यासाठी आणखी ५०० धावांची गरज आहे. या क्रमावरीत सचिन तेंडुलकर १८४२६ ( ४६२ सामने) धावांसह अव्वल स्थानावर आहे.
भारतीय फलंदाजांत विराट कोहली, सौरव गांगुली, राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी, मोहम्मद अझरुद्दीन, रोहित शर्मा, युवराज सिंग आणि वीरेंद्र सेहवाग हे धवनच्या आघाडीवर आहेत.