पार्ल : धावांचा पाठलाग करताना ५ खंदे फलंदाज केवळ ५० धावांमध्ये बाद झाल्याने भक्कम स्थितीत असलेल्या भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पकड गमावली. यामुळे २९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला ५० षटकांत केवळ ८ बाद २६५ धावाच करता आल्या. दक्षिण आफ्रिकेने ३१ धावांनी बाजी मारत तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेने सुरुवातीच्या पडझडीनंतर कर्णधार तेम्बा बवुमा आणि रासी वॅन डेर डुसेन यांच्या वैयक्तिक शतकाच्या जोरावर ५० षटकांत ४ बाद २९६ धावा उभारल्या. कर्णधार लोकेश राहुल लवकर बाद झाल्यानंतर शिखर धवन आणि माजी कर्णधार विराट कोहली यांनी भारताला भक्कम स्थितीत आणले. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ९२ धावांची भागीदारी केली. टी-२० संघातून स्थान गमावलेल्या धवनसाठी ही मालिका महत्त्वाची असून, त्याने आपले नाणे खणखणीत वाजवले. धवनने ८४ चेंडूंत १० चौकारांसह ७९ धावा केल्या. कोहलीने ६३ चेंडूंत ३ चौकारांसह ५१ धावांची संयमी खेळी करत भारताच्या डावाला आकार दिला. केशव महाराजने २६ व्या षटकात धवनला बाद केले आणि काही वेळाने कोहलीही तबरेझ शम्सीचा बळी ठरला. दोघेही बाद झाल्यानंतर भारताचा डाव गडगडला. श्रेयस अय्यर (१७), पदार्पण करणारा व्यंकटेश अय्यर (२), रविचंद्रन आश्विन (७) हे झटपट परतल्याने एकवेळ २५.२ षटकांत १ बाद १३८ धावा, अशा भक्कम स्थितीत असलेला भारतीय संघ ३५.५ षटकांत ६ बाद १८८ असा गडगडला. तळाच्या फळीत शार्दूल ठाकूरने ४३ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह नाबाद ५० धावा केल्या. मात्र, त्याचाही भारताला फायदा झाला नाही. अँडिले फेहलुकवायो, तबरेझ शम्सी आणि लुंगी एनगिडी यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.त्याआधी, बवुमा आणि डुसेन यांनी चौथ्या गड्यासाठी केलेल्या २०४ धावांच्या भागीदारीच्या जोरावर आफ्रिकेने दमदार मजल मारली. क्विंटन डीकॉक (२७), जनेमन मलान (६) व एडेन मार्करम (४) अपयशी ठरले. बवुमाने १४३ चेंडूंत ८ चौकारांसह ११० धावा, तर डुसेनने ९६ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह नाबाद १२९ धावांचा तडाखा दिला. अखेर जसप्रीत बुमराहने ४९ व्या षटकात बवुमाला बाद करत ही जोडी फोडली. डुसेनने अखेरपर्यंत नाबाद राहत आफ्रिकेला तीनशेच्या जवळ नेले. बुमराहने २, तर रविचंद्रन आश्विनने एक बळी घेतला. राहुलची अनोखी कामगिरीलोकेश राहुल ‘अ श्रेणी’ क्रिकेटमध्ये नेतृत्व न करता थेट एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात नेतृत्व करणारा तिसरा भारतीय ठरला. याआधी अशी कामगिरी माजी यष्टिरक्षक सय्यद किरमाणी आणि माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांनी केली होती. नवनिर्वाचित कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळू शकत नसल्याने त्याच्या अनुपस्थितीत संघाची धुरा राहुलकडे आली.महत्त्वाचे पाच किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर खेळत डुसेनने भारताविरुद्ध दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम खेळी केली. श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजने नाबाद १३९ धावा केलेल्या. विराटने विदेशात सर्वाधिक धावा काढण्याचा सचिन तेंडुलकरचा ५,०६५ धावांचा भारतीय विक्रम मोडला. कोहलीने ६३वे एकदिवसीय अर्धशतक झळकावले.कोहलीने आपल्या गेल्या सहा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय खेळीत पाचवे अर्धशतक ठोकले.भारताविरुद्ध शतक ठोकणारा तेम्बा बवुमा दक्षिण आफ्रिकेचा पाचवा कर्णधार ठरला.बवुमा-डुसेन यांनी दक्षिण आफ्रिकेकडून भारताविरुद्ध चौथ्या गड्यासाठी सर्वोत्तम भागीदारी करताना क्विंटन डीकॉक-एबी डीव्हिलियर्स (१७१) यांचा विक्रम मोडला.बवुमा-डेसेन यांनी आफ्रिकेकडून भारताविरुद्धची दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम भागीदारी केली. सर्वोत्तम भागीदारी गॅरी कर्स्टन-हर्षेल गिब्स (२३५) यांच्या नावावर.बवुमा-डुसेन यांनी भारताविरुद्धची चौथ्या गड्यासाठी दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम भागीदारी केली. सर्वोत्तम भागीदारी पाकिस्तानच्या शोएब मलिक-मोहम्मद युसूफ (२०६) यांच्या नावावर.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IND vs SA 1st ODI: भारताने ओढवला पराभव; धवन, कोहली, ठाकूर यांची झुंज ठरली व्यर्थ
IND vs SA 1st ODI: भारताने ओढवला पराभव; धवन, कोहली, ठाकूर यांची झुंज ठरली व्यर्थ
दक्षिण आफ्रिकेने ३१ धावांनी बाजी मारत तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 8:45 AM