IND vs SA 1st T20 : भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीसाठी आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला आहे. सहा महिन्यांवर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा आली असली तरी भारतीय संघात अजूनही प्रयोग सुरूच आहेत... विराट कोहली व रोहित शर्मा हे सीनियर्स मागील दीडेक वर्ष ट्वेंटी-२० फॉरमॅट खेळले नाहीत, तरीही त्यांच्यापर्यंतच BCCIचं घोडं अडलं आहे... आताही दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत रोहित, विराट नाही, तरीही भारताला सेट प्लेइंग इलेव्हन निवडताना डोकं खाजवावं लागतंय. आफ्रिका दौऱ्यावरील ट्वेंटी-२० मालिकेतील संघात ३ सलामीवीर, मधल्या फळीतील ६ फलंदाज, ४ फिरकीपटू व ४ जलदगती गोलंदाज आहेत. यातून कोणाला अंतिम ११ मध्ये खेळवायचे हा प्रश्न संघ व्यवस्थापनासमोर आहे.
India vs South Africa यांच्यातली पहिली ट्वेंटी-२० मॅच रविवारी होणार आहे. रवींद्र जडेजा, शुबमन गिल अजून आफ्रिकेत आलेले नाहीत, तर दीपक चहर वडिलांची प्रकृती खराब असल्याने भारतातच थांबला आहे. तो या मालिकेत खेळेल की नाही, हेही अद्याप स्पष्ट नाही. सूत्रांच्या माहितीनुसार गिल व जडेजा पहिल्या सामन्यापूर्वी संघात दाखल होतील. पण, पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेव्हन निवडताना चांगलीच डोकेदुखी होणार आहे. सलामीच्या दोन जागांसाठी यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड व शुबमन गिल यांच्यात शर्यत आहे. शुबमन हा टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटमधील संघाचा नियमित ओपनर आहे. शुबमन, ऋतुराज व यशस्वी यांची ट्वेंटी-२०तील कामगिरी दमदार झालेली आहे. पण, ऋतुराज व यशस्वी यांच्यापैकी एकालाच संधी मिळणार आहे.
शुबमनने २०२३ मध्ये ट्वेंटी-२०त ११ सामन्यांत ३०४ धावा केल्या आहेत, तेच ऋतुराजने १० सामन्यांत ३६५ व यशस्वीने १३ सामन्यांत ३७० धावा केल्या आहेत. मधल्या फळीत तिलक वर्मा, श्रेयस अय्यर, इशान किशन, जितेश शर्मा, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग हे पर्याय आहेत. यापैकी सूर्या, श्रेयस व इशान यांचे स्थान पक्के आहे. रिंकू सिंगलाही संधी मिळेल. जितेशल वाट पाहावी लागू शकेल. रवींद्र जडेजा उप कर्णधार आहे. रवी बिश्नोईने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कुलदीप यादवनेही सातत्य राखले आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या वाट्याला पुन्हा बाकावरच बसून राहण्याची वेळ येणार आहे. दीपक चहरच्या न येण्याने जलदगती गोलंदाजांमधील स्पर्धा कमी झाली आहे. मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, अर्शदीप सिंग यांचे खेळणे पक्के आहे.
ट्वेंटी- २० संघ - सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन, जितेश शर्मा, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.
ट्वेंटी-२० मालिका
१० डिसेंबर - डर्बन, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून१२ डिसेंबर - जीकबेर्हा, रात्री ८.३० वाजल्यापासून१४ डिसेंबर - जोहान्सबर्ग, रात्री ८.३० वाजल्यापासून