ind vs sa t20 : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात मोठा विजय मिळवला. संजू सॅमसनने ऐतिहासिक कामगिरी करताना ट्वेंटी-२० मध्ये सलग दुसऱ्या सामन्यात शतक ठोकणारा पहिला भारतीय बनण्याचा मान पटकावला. बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सॅमसनने स्फोटक खेळी केली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वातील टीम इंडियाने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ६१ धावांनी पराभव करुन विजयी सलामी दिली. सॅमसनने ५० चेंडूत १०७ धावांची झंझावाती खेळी केली.
नाणेफेक जिंकून यजमानांनी पाहुण्या भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. अभिषेक शर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतर सॅमसनने स्फोटक खेळी करुन आफ्रिकेच्या गोलंदाजांची पळता भुई थोडी केली. त्याने आपल्या खेळीत एकूण १० षटकार आणि ७ चौकार लगावले. संजूच्या अप्रतिम कामगिरीनंतर त्याची पत्नी चारुलथा सॅमसनने भारी प्रतिक्रिया दिली.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत चारुलथाने आनंद व्यक्त केला. तसेच तिने आपल्या पतीला सुपरस्टार असे संबोधले. "माझा कायमस्वरुपी आवडता हिरो", अशा आशयाचे कॅप्शन चारुलथाने दिले.
भारताची विजयी सलामी
तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने मालिकेत १-० ने आघाडी घेतली. भारताने दिलेल्या २०३ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ सपशेल अपयशी ठरला. यजमान संघ निर्धारित षटकेही खेळू शकला नाही आणि १७.५ षटकांत अवघ्या १४१ धावांत सर्वबाद झाला. भारताकडून वरुण चक्रवर्थी आणि रवी बिश्नोई या फिरकी गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करताना प्रत्येकी ३-३ बळी घेतले, तर आवेश खान (२) आणि अर्शदीप सिंगला (१) बळी घेण्यात यश आले.
Web Title: ind vs sa 1st t20 Sanju Samson's wife Charulatha Samson reacts after scoring a century
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.