India vs South Africa 1st T20I Live : इशान किशनने ( Ishan Kishan) आज दिल्लीचे स्टेडियम दणाणून सोडले. ऋतुराज गायकवाडसह आश्वासक सुरुवात करताना इशानने भारताला चांगली सुरुवात करून दिली. इशानने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची निर्दयीपणे धुलाई केली. ऋतुराज व इशानने ५७ धावांची भागीदारी केली, त्यानंतर इशानने दुसऱ्या विकेटसाठी श्रेयस अय्यरसह ४० चेंडूंत ८० धावा चोपल्या. अखेरच्या ४ षटकांत कर्णधार रिषभ पंतची ( Rishabh Pant) फटकेबाजी पाहण्यासारखी होती. भारताच्या सर्व फलंदाजांचे फटके एकदम दमदार होते आणि त्यात आफ्रिकेच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाने त्यांना मदतच केली.
लोकेश राहुलने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे इशान किशन व ऋतुराज गायकवाड या नव्या जोडीने भारताच्या डावाची सुरुवात केली. कागिसो रबाडा, एनरिच नॉर्खिया व वेन पार्नेल अशी जलदगती गोलंदाजांची फौज मैदानावर उतरली. पण, इशान व ऋतुराज यांनी दमदार फटकेबाजी केली. ऋतुराजने मारलेले षटकार पाहण्यासारखे होते. या दोघांनी ५.५ षटकांत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. ७व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ऋतुराजने सुरेख षटकार खेचला, परंतु पार्नेलने दुसऱ्याच चेंडूवर भारताला धक्का दिला. ऋतुराज १५ चेंडूंत ३ षटकार खेचून २३ धावांवर बाद झाला.
श्रेयस अय्यरने फिरकीपटू तब्रेज शम्सीला टार्गेट केले. १०व्या षटकात अय्यरने दोन खणखणीत षटकार खेचले. भारताने ९.४ षटकांत १०० धावा फलकावर चढवल्या. केशव महाराजला डाव्या बाजूला षटकार खेचून इशानने ट्वेंटी-२० तील तिसरे अर्धशतक पूर्ण केले. इशानने ३७ चेंडूंत ९ चौकार १ षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर तर त्याने केशव महाराजच्या एका षटकात ६,६,४,४ अशा २० धावा कुटल्या. पण, त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर इशान झेलबाद झाला. त्याने ४८ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह ७६ धावा केल्या. अय्यर ३६ धावांवर माघारी परतल्यानंतर रिषभ व हार्दिकने अखेरच्या षटकांत फटकेबाजी केली.
या दोघांनी १८ चेंडूंत ४६ धावा चोपल्या. रिषभ १६ चेंडूंत २९ धावा करून माघारी परतला. हार्दिकने १२ चेंडूंत ३१ धावांवर नाबाद राहिला. भारताने ४ बाद २११ धावांचा डोंगर उभा केला. भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ही सर्वोत्तम खेळी ठरली. ( India vs South Africa 1st T20I सामन्याचा धावफलक एका क्लिकवर)
Web Title: IND vs SA 1st T20I Live : Ishan Kishan’s stunning opening act of 76 (48); India post 211/4 in 20 overs. Highest T20I score at Arun Jaitley Stadium, New Delhi.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.