India vs South Africa 1st T20I Live Updates : ऑस्ट्रेलियानंतर भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यास मैदानावर उतरला आहे. आशिया चषक २०२२ स्पर्धेला मुकल्यानंतर प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन केले. तीन सामन्यांपैकी दोनच सामने तो खेळला, परंतु काही खास कामगिरी झाली नाही. त्यात आजपासून सुरू झालेल्या आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यातही तो प्लेइंग इलेव्हनमध्ये नाही.
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत २० ट्वेंटी-२० सामने झाले आणि त्यात जय-पराजयाचे पारडे हे भारताच्या बाजूने ११-८ असे आहे. पण, भारताला घरच्या मैदानावर ५ वेळा आफ्रिकेकडून हार मानावी लागली आहे. ९ पैकी ३ सामने भारताला जिंकता आले आहेत. तिरुअनंतपूरम येथे तीन वर्षांनी ट्वेंटी-२० सामना होतोय.. खेळपट्टीवर गवत असल्याने सुरुवातीच्या काही षटकांत जलदगती गोलंदाजाला भरपूर मदत मिळणार आहे, त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला जरा अधिक फायदा मिळेल. येथे झालेल्या १० ट्वेंटी-२० सामन्यांत प्रथम फलंदाजी करणारा संघ फक्त ३ वेळा जिंकला आहे, तर ७ वेळा पराभूत झाला आहे.
मागे झालेल्या ५ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत आफ्रिकेने बाजी मारली होती. त्या मालिकेत रोहित शर्माला विश्रांती दिली गेली होती. हार्दिकच्या जागी रिषभ पंतला संधी मिळाली आहे, जसप्रीत बुमराहला दुखापतीमुळे आज मुकावे लागले आणि त्याच्या जागी दीपक चहर खेळणार आहे, युजवेंद्र चहलच्या जागी आर अश्विन खेळेल. BCCI ने दिलेल्या माहितीनुसार सराव सत्रात जसप्रीत बुमराहच्या पाठीच्या दुखापतीने डोकं वर काढले. वैद्यकीय टीम त्याच्यावर उपचार करत आहे. तो पहिल्या ट्वेंटी-२०त खेळणार नाही.