India vs South Africa 1st T20I Live Updates : १०७ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघालाही झटके बसलेच... रोहित शर्मा शून्यावर, तर विराट कोहली ३ धावांवर माघारी परतले. भारताला पॉवर प्लेमध्ये १७ धावाच करता आल्या आणि ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ही भारताची निचांक कामगिरी ठरली. यापूर्वी २०१६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताने पॉवर प्लेमध्ये ३ बाद २१ धावा केल्या होत्या. भारताच्या ७ षटकांत २ बाद ३० धावा झाल्या आहेत. सूर्यकुमार यादवने आल्या आल्या दोन खणखणीत सिक्स खेचले.
अर्शदीप सिंग ( Arshdeep Singh) आणि दीपक चहर ( Deepak Chahar) यांनी आज कहर केला. सुरुवातीलाच गोलंदाजांना पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर दोघांनी २.३ षटकांत दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ माघारी पाठवला. १५ चेंडूंत ९ धावा व ५ विकेट्स अशी दयनीय अवस्था केली. २००७मध्ये आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्ध १० धावांत निम्मा संघ गमावला होता. केशव महाराजने ( Keshav Maharaj) उल्लेखनीय कामगिरी करून भारतासमोर समाधानकारक लक्ष्य उभे केले. दीपक चहरने पहिल्याच षटकात अप्रतिम इनस्वींग चेंडू टाकून दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाचा त्रिफळा उडवला. अर्शदीप सिंगने दुसऱ्या षटकात क्विंटन डी कॉक, रिली रोसोवू व डेव्हिड मिलर यांना बाद केले.