India vs South Africa 1st T20I Live : टीम इंडियाचा दुसरा युवा कर्णधार बनण्याचा विक्रम केलेल्या रिषभ पंतला ( Rishabh Pant) आजच्या सामन्यात विजय मिळवून विश्वविक्रमी कामगिरी करण्याची संधी होती. रिषभने हा सामना जिंकला असता तर भारताच्या नावावर सलग १३ ट्वेंटी-२० सामने जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला गेला असता. पण, २११ धावा फलकावर उभ्या करूनही भारताला पराभव पत्करावा लागला. ट्वेंटी-२०त आतापर्यंत भारताने २००+ धावा करून एकही सामना गमावला नव्हता आणि तो नकोसा विक्रम रिषभच्या नावावर नोंदवला गेला. डेव्हिड मिलर व रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन यांनी नाबाद १३१ धावांची भागीदारी करून दक्षिण आफ्रिकेला एकतर्फी विजय मिळवून दिला.
इशान किशनने ४८ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह ७६ धावा करून भारताचा पाया मजबूत केला. ऋतुराज गायकवाड ( २३), श्रेयस अय्यर ( ३६), रिषभ पंत ( २९) व हार्दिक पांड्या ( ३१*) यांच्या फटकेबाजीने टीम इंडियाने २११ धावांचा डोंगर उभा केला. दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या षटकात कर्णधार टेम्बा बवुमाची ( १०) विकेट गमावली. ड्वेन प्रेटोरियस ( २९) व क्विंटन डी कॉक ( २२) हे माघारी परतल्यानंतर डेव्हिड मिलर व रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन यांनी दमदार फटकेबाजी केली. व्हॅन डेर ड्यूसेन ४६ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह ७५ धावांवर, तर मिलर ३१ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ६४ धावांवर नाबाद राहिला. या दोघांनी ६४ चेंडूंत नाबाद १३१ धावांची भागीदारी करताना आफ्रिकेला ७ विकेट्स व ५ चेंडू राखून विजय मिळवून दिला.
रिषभ पंत काय म्हणाला?
'' आम्ही फलकावर पुरेशा धावा चढवल्या होत्या, परंतु आम्ही आखलेल्या रणनीतीची योग्य अंमलबजावणी करण्यात चुकलो. पण, प्रतिस्पर्धींना श्रेय द्यायलाच हवे. मिलर व व्हॅन डेर ड्यूसेन यांनी चांगली फलंदाजी केली. आम्ही फलंदाजी करत होतो, तेव्हा असे वाटले की संथ चेंडू फेकण्याची रणनीती कामी येईल. पण, दुसऱ्या डावात खेळपट्टी अधिक चांगली झाली. पुढील सामन्यात अशीच परिस्थिती उद्भवल्यास आम्ही चांगली कामगिरी करून दाखवू,''असे रिषभ पंत म्हणाला.
Web Title: IND vs SA 1st T20I Live : We had enough on the board but I think we were a little off with our execution. Sometimes you have to give credit to the opposition, say Indian captain Rishabh Pant
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.