IND vs SA 1st Test – Centurion Weather Report: भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. ओमायक्रॉनच्या धोका लक्षात घेता दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डानं आधीच प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी नाकारली आहे. त्यात आणखी एक टेंशन वाढवणारी बातमी समोर आली आहे. भारतीय संघ २९ वर्षांत दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात आहे, परंतु त्यांच्या या मार्गात आसमानी संकट येण्याची शक्यता आहे. सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट्स पार्क येथे होणाऱ्या या सामन्यातील पहिले दोन दिवस पावसामुळे वाया जाण्याची शक्यता आहे. हवामानाचा अंदाज तसा व्यक्त करत आहे.
२६ आणि २७ डिसेंबरला सेंच्युरियन येथे मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे, तर उर्वरित दिवस पावसाची संततधार सुरूच राहणार आहे. पहिल्या दोन दिवसाचा ६०% टक्के खेळ पावसामुळे वाया जाण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, भारतीय संघानं सोमवारपासून सेंच्युरियन येथे सरावाला सुरुवात केली. खेळपट्टीवरील गवत पाहून श्रेयस अय्यरनं आश्चर्च व्यक्त केले होते. खेळपट्टी पाहिल्यानंतर अय्यर म्हणाला,''या खेळपट्टीवर खूप गवत आहे. येथे फलंदाजांची खरी कसोटी लागणार आहे.'' सराव सुरू करण्यापूर्वी द्रविडनं एकच मंत्र दिला आणि तो म्हणजे, मोकळ्या मनानं क्वालिटी सराव करा.'' त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना धीर मिळाला. BCCIनं पोस्ट केलेल्या या व्हिडीओत अय्यरनं संघातील अनुभवी गोलंदाज इशांत शर्मालाही खेळपट्टीबाबत विचारले. त्यावर तो म्हणाला, या खेळपट्टीवर चेंडू प्रचंड वळणार आहे. फलंदाजी करताना अवघड जाणार आहे.
भारतीय संघ सेंच्युरियन पार्कवर २०१० व २०१८ मध्ये कसोटी सामना खेळला अन् दोन्ही वेळेत दक्षिण आफ्रिकेनं बाजी मारली. २०१०मध्ये दक्षिण आफ्रिकानं एक डाव व २५ धावांनी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियावर विजय मिळवला होता. २०१८मध्ये विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला येथे १३५ धावांनी पराभव पत्करावा लागला होता.