IND vs SA 1st Test Day 3 Live Updates: पहिल्या दिवशी फलंदाजांचे आणि दुसऱ्या दिवशी पावसाचे वर्चस्व असलेल्या कसोटीत तिसऱ्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात भारतीय संघाने १ बाद १६ धावांची मजल मारली. त्याआधी भारताचा पहिला डाव ३२७ धावांवर तर दक्षिण आफ्रिकेचा संघ १९७ धावांवर आटोपला. तिसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाकडे १४६ धावांची आघाडी असून राहुल नाबाद ५ तर नाईट वॉचमन शार्दूल ठाकूर नाबाद ४ धावांवर खेळत आहे. मयंक अग्रवाल मात्र ४ धावांवर बाद झाला. संपूर्ण दिवसात एकूण १८ गडी बाद झाले. आफ्रिकेच्या लुंगी एन्गीडीने सहा तर भारताच्या मोहम्मद शमीने पाच बळी टिपले.
भारतीय फलंदाजांची घसरगुंडी
टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेणाऱ्या भारताने पहिला दिवस उत्तम खेळला. पहिल्या दिवशी भारतीय संघाने ३ गड्यांच्या मोबदल्यात २७२ धावा केल्या. पण तीच लय तिसऱ्या दिवशी त्यांना कायम ठेवता आली नाही. खेळ सुरू झाल्यानंतर अवघ्या दीड तासात भारताने ५५ धावांत उर्वरित सात गडी गमावले. लोकेश राहुलने १२३ धावांची तर मयंक अग्रवालने ६० धावांची खेळी केली. टीकेचं लक्ष्य ठरत असलेल्या अजिंक्य रहाणेनेही ४८ धावा केल्या. आफ्रिकेकडून लुंगी एन्गीडीने सहा बळी टिपले. रबाडाने तीन तर जेन्सनने एकमेव बळी घेत त्याला चांगली साथ दिली.
दक्षिण आफ्रिकन फलंदाजांची शरणागती
भारताच्या घसरगुंडीनंतर आफ्रिकन फलंदाजांचीही काहीशी तशीच अवस्था झाली. पहिल्या षटकात कर्णधाराची विकेट गमावलेल्या आफ्रिकेने दुसऱ्या सत्रात आणखी चार बळी गमावले. क्विंटन डी कॉक आणि टेंबा बावुमा या दोघांनी काही काळ झुंज दिली. पण दुसऱ्या सत्रात डी कॉक ३४ धावांंत माघारी परतला. टी टाईमनंतर खेळण्यास उतरलेल्या बावुमाने आपलं अर्धशतक पूर्ण केलं पण नंतर ५२ धावांवर तो देखील माघारी परतला. रबाडाने उपयुक्त २५ धावा केल्या पण इतर सारेच फलंदाज झटपट बाद झाले.
टीम इंडियाची वेगवान गोलंदाजी चमकली
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने दमदार कामगिरी करून दाखवली. त्याने भेदक मारा करत ४४ धावांत पाच बळी टिपले. जसप्रीत बुमराहने १६ धावांत दोन तर शार्दूलने ५१ धावांत दोन गडी बाद केले. सिराजच्या नावावर केवळ एकच बळीची नोंद झाली.