IND vs SA 1st Test Day 3 Live: भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर लोकेश राहुल याने पहिल्या दिवसाच्या खेळावर वर्चस्व गाजवलं. पहिल्या दिवशी त्याने शानदार शतक ठोकलं. त्याचा साथीदार मयंक अग्रवाल यानेही अर्धशतकी खेळी केली. दिवसाचा खेळ संपेपर्यंत राहुलने अजिंक्य रहाणेच्या साथीने डाव सांभाळत संघाला २७२ धावांपर्यंत मजल मारून दिली. त्यानंतर दुसरा दिवस पावसामुळे वाया गेला. पण तिसऱ्या दिवशी मात्र दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांनी दमदार कमबॅक केलं. पहिल्या सत्राच्या पहिल्या तासाभरात लोकेश राहुल, अजिंक्य रहाणे आणि रविचंद्रन अश्विन यांना तंबूत धाडलं.
लोकेश राहुल १२२ धावांवर नाबाद असताना तिसऱ्या दिवशी मैदानात उतरला. त्याने संयमी सुरूवात केली पण लेग साईडला जाणारा एक चेंडू खेळण्याचा मोह त्याला आवरला नाही. त्या चेंडूला टोलवताना तो बाद झाला आणि १२३ धावांवर त्याला माघारी परतावे लागले. त्याच्या पाठोपाठ अजिंक्य रहाणेचंही अर्धशतक हुकलं. रहाणे चांगली खेळी करण्याच्या उद्देशाने खेळत होता. पण लुंगी एन्गीडीचा एक चेंडू त्याला खेळता आला नाही. त्याने फटका लगावण्याचा प्रयत्न केला आणि तो किपरकडे झेल देऊन बाद झाला. रहाणेने १०२ चेंडूत ९ चौकारांसह ४८ धावा केल्या.
अजिंक्य रहाणेनंतर भारताचा डाव पूर्णपणे गडगडला. लुंगी एन्गीडी आणि कागिसो रबाडा या दोघांच्या वेगवान अन् भेदक माऱ्यापुढे भारतीय फलंदाजांनी गुडघेच टेकले. तडाखेबाज खेळीसाठी प्रसिद्ध असलेला ऋषभ पंत ८ धावांवर माघारी परतला. रविचंद्रन अश्विन आणि शार्दूल ठाकूर हे दोन्ही अष्टपैलू खेळाडू ४-४ धावा करून तंबूत गेले. मोहम्मद शमीदेखील ८ धावांवर बाद झाला. एन्गीडी आणि रबाडा, दोघांनीही पहिल्या तासाभरात प्रत्येकी ३-३ बळी घेतले.