India vs South Africa 1st Test Day 4 Live: पहिली कसोटी जिंकण्यासाठी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला ३०५ धावांचे आव्हान दिले. अतिशय सुमार फलंदाजी केल्यामुळे भारतीय संघाचा दुसरा डाव १७४ धावांवरच आटोपला. ऋषभ पंतच्या ३४ धावा ही डावातील सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या ठरली. कगिसो रबाडा, लुंगी एन्गीडी आणि मार्को जेन्सन या आफ्रिकेच्या वेगवान माऱ्यापुढे भारतीय फलंदाजांची दाणादाण उडाली. त्यामुळे एकेकाळी ४००पेक्षा अधिक धावांची आघाडी घेण्याची अपेक्षा असलेल्या भारताला ३०५ धावांचेच आव्हान देता आले.
भारताचा पहिला डाव ३२७ धावांवर तर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १९७ धावांवर संपला. त्यामुळे भारताला १३० धावांची आघाडी मिळाली. तेथून पुढे खेळताना मयंक अग्रवाल ४ धावांवर बाद झाला. तिसऱ्या दिवसाचा थोडाच खेळ शिल्लक असल्याने शार्दूल ठाकूरला फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. त्याने दिवस संपेपर्यंत लोकेश राहुलला चांगली साथ दिली. पण चौथ्या दिवशी खेळ सुरू होताच भारताच्या डावाला गळती लागली. शार्दूल १० धावांवर तर राहुल २३ धावांवर माघारी परतला.
दुसऱ्या सत्रात तर अतिवेगान गडी बाद होत राहिले. विराट कोहली १८, चेतेश्वर पुजारा १६ तर अजिंक्य रहाणे २० धावा काढून बाद झाला. पाठोपाठ रविचंद्रन अश्विन १४, मोहम्मद शमी १, ऋषभ पंत ३४ धावांवर माघारी परतले. बुमराहने ७ धावांवर नाबाद राहिला पण सिराज शून्यावर बाद झाला आणि टीम इंडियाचा डाव १७४ धावांवरच संपला. नवखा मार्को जेन्सन आणि कगिसो रबाडा या दोघांनी ४-४ तर लुंगी एन्गीडीने २ बळी टिपले.