IND vs SA 1st test Day 4 Live Updates Lunch Break: भारतीय संघाने चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात संयमी खेळी करत दोन गड्यांच्या मोबदल्यात ६३ धावांची भर घातली. तिसऱ्या दिवशी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांचा पहिला डाव गडगडल्यानंतर दिवसअखेर मयंक अग्रवालने आपली विकेट गमावली होती. त्यानंतर चौथ्या दिवशी १ बाद १६ या धावसंख्येवरून भारताने खेळाला सुरूवात केली. शार्दूल ठाकूरने १० धावा केल्यानंतर रबाडाना माघारी धाडले. तर पहिल्या डावातील शतकवीर लोकेश राहुल दुसऱ्या डावात २३ धावा काढून लुंगी एन्गीडीचा शिकार झाला. पण महत्त्वाची बाब म्हणजे, भारताकडे सध्या द्विशतकी (२०९*) आघाडी असून विराट कोहली (१८*) आणि चेतेश्वर पुजारा (१२*) हे दोन अनुभवी फलंदाज मैदानात आहेत.
त्याआधी, भारतीय संघाचा पहिला डाव ३२७ धावांवर संपुष्टात आला. लोकेश राहुल (१२३) आणि मयंक अग्रवाल (६०) यांनी संघाला चांगली सलामी मिळवून दिली होती. अजिंक्य रहाणेनेही ४८ धावा केल्या. पण इतर फलंदाजांच्या खराब फलंदाजीमुळे भारताला केवळ त्रिशतकी मजलच मारता आली. आफ्रिकेच्या लुंगी एन्गीडीने सहा बळी घेतले.
भारताच्या डावानंतर दक्षिण आफ्रिकन फलंदाज मैदानात आले. पण त्यांनाही फारसा प्रभाव पाडता आला नाही. ६३ षटकांच्या खेळात १९७ धावांवर त्यांचा डाव संपला. टेंबा वाबुमाने एकाकी झुंज देत ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली. क्विंटन डी कॉकनेही अनुभवाचा कस लावत चांगली सुरूवात केली होती. पण त्याला ३४ धावांवर बाद व्हावे लागले. इतर साऱ्याच फलंदाजांनी निराश केल्यामुळे आफ्रिकेचा डाव स्वस्तात गुंडाळला गेला आणि टीम इंडियाला १३० धावांची आघाडी मिळाली.