India vs South Africa 1st test Day 5: भारतीय संघाने दुसऱ्या डावात केवळ १७४ धावा केल्या. पण पहिल्या डावात मिळालेल्या १३० धावांच्या आघाडीच्या जोरावर भारताने आफ्रिकेला ३०५ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना एका बाजूने विकेट्स पडत राहिल्या, पण कर्णधार डीन एल्गरने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत किल्ला लढवला. पाचव्या दिवशी पहिला अर्धा तास नीट खेळून काढल्यावर एल्गर बाद झाला. त्यामुळे टेंबा बावुमा आणि क्विंटन डी कॉक ही अनुभवी फलंदाजांची शेवटची जोडी मैदानात होती. या जोडीवर संघाचा पराभव टाळण्याची मोठी जबाबदारी असतानाच डी कॉकने पहिल्या डावात केलेलीच चूक पुन्हा केली आणि भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. त्यामुळेच पाचव्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत आफ्रिकेची अवस्था ७ बाद १८२ झाली.
क्विंटन डी कॉकने पहिल्या डावात चांगली सुरूवात करत ३४ धावांची खेळी केली. पण शार्दूल ठाकूरने ऑफ स्टंपबाहेर टाकलेल्या चेंडूला त्याने बॅट लावली आणि चेंडू बॅटला लागून थेट स्टंपवर आदळला. दुसऱ्या डावातही क्विंटन डी कॉकने चांगली सुरूवात केली होती. झटपट धावा करून भारतीय गोलंदाजांवर दबाव टाकण्याचा त्याचा मानस होता. पण मोहम्मद सिराजने त्याला ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू टाकला आणि त्याने पुन्हा तीच चूक केली. डी कॉकच्या चुकीमुळे चेंडू बॅटला लागून स्टंपवर आदळला. डी कॉक - बावुमा ही आफ्रिकेची अनुभवी फलंदाजांची शेवटची जोडी होती. त्यामुळे डी कॉकच्या विकेटमुळे एका अर्थाने भारतीय संघाच्या विजयाचा मार्गच मोकळा झाला.
गेल्या तीन-चार वर्षांच्या कालावधीत भारतीय संघाने क्विंटन डी कॉकला चांगलंच कात्रीत पकडल्याचं दिसतंय. २०१८ साली जेव्हा भारतीय संघ आफ्रिकेविरूद्ध कसोटी मालिका खेळला होता. तेव्हादेखील भारताच्या वेगवान गोलंदाजांनी तीन वेळ क्विंटन डी कॉकला ऑफ स्टंपबाहेरील चेंडूवरच बाद केलं होतं.
दरम्यान, ४ बाद ९४ या धावसंख्येवरून पाचव्या दिवसाचा खेळ सुरू केल्यावर डीन एल्गर (७७) आणि डी कॉक (२१) बाद झाले. पाठोपाठ विअन मुल्डरही बाद झाला. त्यामुळे आफ्रिकेची अवस्था लंच ब्रेकपर्यंत ७ बाद १८२ अशी झाली. आता टेंबा बावुमा एकाकी झुंज देत ३४ धावांवर नाबाद आहे.