Kagiso Rabada Virat Kohli Shreyas Iyer, IND vs SA Live Updates : दक्षिण आफ्रिके विरूद्ध पहिल्या कसोटीत भारताच्या डावाची सुरूवात अत्यंत खराब झाली. सर्वप्रथम भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस गमावला. त्यानंतर चहापानापर्यंत भारताचे १७६ धावांत तब्बल सात गडी माघारी परतले. भारताच्या वरच्या फळीला फारशी झुंज देता आली नाही. २४ धावांतच भारताचे ३ बळी बाद झाले होते. पण त्यानंतर चौथ्या विकेटसाठी विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या दोघांनी चांगली खेळी केली. त्यांच्या खेळीने काहीशा भारताच्या मोठ्या धावसंख्येकडे जाण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु, कगिसो रबाडाने अय्यर आणि विराट दोघांना बाद करत संघाचा कणा मोडला.
विराट आणि श्रेयस यांनी ३ बाद २४ धावांवर या धावसंख्येवरून खेळाला सुरूवात केली. त्यांनी मजल दरमजल करत संघासाठी मौल्यवान ६८ धावा जोडल्या. दोघेही चांगल्या चेंडूवर डिफेन्स करत होते पण वाइट चेंडू धाव घेण्यातही ते तितकेच माहीर दिसले. अखेर कगिसो रबाडाने भारताची ही तटबंदी फोडली. एका आखूड टप्प्याच्या चेंडूवर रबाडाने श्रेयस अय्यरला क्लीन बोल्ड केले. चेंडू बाऊन्स होईल असे वाटत असताना चेंडू खाली राहिला आणि श्रेयस त्रिफळाचीत झाला. अय्यरने ५० चेंडूत ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३१ धावा केल्या.
विराटने मात्र दुसरी बाजू लावून धरली होती. केएल राहुलच्या साथीने विराटने शानदार फलंजादी केली. विराट हळूहळू अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करत होता. पण रबाडाच्या चलाख माऱ्याने त्याचाही बळी घेतला. कगिसो रबाडाने विराटला ३८ धावांवर बाद केले.