Dean Elgar KL Rahul IND vs SA 1st Test Day 2: भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या दिवसअखेर ५ बाद २५६ धावांपर्यंत मजल मारली. भारताचा पहिला डाव दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात २४५ धावांवर आटोपला. त्यानंतर आफ्रिकेने दिवसाचा खेळ संपेपर्यंत दमदार प्रत्युत्तर देत २५०पार मजल मारली. भारताकडून केएल राहुलने १०१ धावांची शतकी खेळी केली. पण आफ्रिकेकडून आपली शेवटची कसोटी मालिका खेळणाऱ्या डीन एल्गारने प्रत्युत्तरात दमदार शतक केले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एल्गारने नाबाद १४० धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेचा नियमित कर्णधार टेम्बा बावुमा दुखापतग्रस्त असल्याने एडन मार्करम आणि डीन एल्गार सलामीला आले. मार्करम ५ धावांत बाद झाला. त्यानंतर टोनी डी जॉर्जी २८ धावांवर, कीगन पीटरसन २ धावांवर माघारी परतले. डीन एल्गारने डेव्हिड बेडिंगहॅमच्या साथीने आफ्रिकेच्या डावाचा भक्कम पाया रचला. या दोघांनी शतकी भागीदारी केली. बेडिंगहॅम ७ चौकार आणि २ षटकारांच्या साथीने ५६ धावा काढून बाद झाला. कायल वेरीनही ४ धावांवर तंबूत परतला. पण डीन एल्गारने दमदार खेळी केली. त्याने नाबाद राहत १४० धावा केल्या. त्याने त्याची खेळी २३ चौकारांनी सजवली. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि सिराजने २-२ तर प्रसिध कृष्णाने १ बळी टिपला.
भारताच्या पहिल्या डावात कर्णधार रोहित शर्मा ५, युवा यशस्वी जैस्वाल १७ तर शुबमन गिल २ धावांवर बाद झाला. विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने ६८ धावांची भागीदारी केली. पण अय्यर ३१ आणि विराट ३८ धावांवर माघारी परतला. शार्दुल ठाकूरने २४ धावांची झुंज दिली. पण रविचंद्रन अश्विन (८) आणि जसप्रीत बुमराह (१), मोहम्मद सिराज (५) झटपट बाद झाले. केएल राहुलने मात्र एकाकी झुंज देत १३३ चेंडूत शतक झळकावले. त्याने आपल्या डावात १४ चौकार आणि ४ षटकार मारले. आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने ५, नांद्रे बर्गरने ३ तर मार्को येन्सन, कोईत्झे यांनी १-१ बळी टिपला.