Dean Elgar Hundred IND vs SA 1st Test Live : भारतीय संघाच्या फलंदाजांची त्रेधातिरपीट उडवणाऱ्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीराने दमदार शतक ठोकले. केएल राहुलच्या संयमी शतकामुळे भारताला कशीबशी २४५ धावांपर्यंत मजल मारता आली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून आफ्रिकन सलामीवीर डीन एल्गार याने १४० चेंडूत धडाकेबाज शतक ठोकले आणि यजमान संघाला एका भक्कम स्थितीत आणले. डीन एल्गारने भारताविरूद्धच्या मालिकेनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे, त्यामुळे त्याच्यासाठी हे शतक नक्कीच खास आहे.
प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव २४५ धावांवर आटोपला. त्यानंतर आफ्रिकेच्या पहिल्या डावात सलामीवीर एडन मार्करम स्वस्तात बाद झाला. त्याला मोहम्मद सिराजने अवघ्या ५ धावांवर बाद केले. त्यानंतर डीन एल्गारने डी जॉर्जीसोबत भागीदारी केली. जॉर्जी २८ धावांवर तर पीटरसन २ धावांवर बाद झाला. जसप्रीत बुमराहने दोघांना माघारी धाडले. पण डीन एल्गारने एका बाजूने दमदार खेळ सुरू ठेवला. त्याने १४० चेंडूत तब्बल १९ चौकारांच्या साथीने शतक ठोकले.
त्याआधी प्रथम फलंदाजी करताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा ५, युवा यशस्वी जैस्वाल १७ तर शुबमन गिल २ धावांवर बाद झाला. विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने ६८ धावांची भागीदारी केली. पण अय्यर ३१ आणि विराट ३८ धावांवर माघारी परतला. शार्दुल ठाकूरने २४ धावांची झुंज दिली. पण रविचंद्रन अश्विन (८) आणि जसप्रीत बुमराह (१), मोहम्मद सिराज (५) झटपट बाद झाले. केएल राहुलने मात्र एकाकी झुंज देत १३३ चेंडूत शतक झळकावले. त्याने आपल्या डावात १४ चौकार आणि ४ षटकार मारले.