India vs South Africa 1st test: भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजीचा पर्याय निवडला. कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताच्या सलामीवीरांनी तो सार्थ ठरवला. उपकर्णधार लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल या दोघांनी संयमी आणि शानदार खेळी करत पहिले सत्र बिनबाद खेळून काढले. दुसऱ्या सत्राच्या सुरूवातीला या मयंक अग्रवालने आपले अर्धशतक साजरे केले. त्यानंतर लगेचच संघाचे शतकही पूर्ण झाले. या शतकी भागीदारीसह या जोडगोळीने एक दमदार विक्रम केला.
मयंक अग्रवाल आणि केएल राहुल हे दोघेही कर्नाटकचे खेळाडू आहेत. कर्नाटकचे अनेक खेळाडू आतापर्यंत भारतीय संघात खेळून गेले. मात्र लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल या दोघांनी एक नवा इतिहास रचला. दक्षिण आफ्रिकेत पहिल्याच सामन्यात त्यांनी शतकी भागीदारी केली. भारताकडून कसोटी खेळताना दोन कर्नाटकी खेळाडूंनी सलामीवीर म्हणून शतकी भागीदारी करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. याआधी कोणत्याही भारतीय खेळाडूला हा पराक्रम करता आलेला नव्हता.
तसेच, कसोटी क्रिकेटमधून भारताकडून खेळताना कर्नाटकी खेळाडूंनी शतकी भागीदारी करण्याची ही तिसरी वेळ ठरली. या आधी १९७६ साली वेलिंग्टनमध्ये ब्रिजेश पटेल आणि सैयद किरमाणी या दोघांनी सातव्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर लोकेश राहुल आणि करूण नायर या दोघांनी चेन्नईच्या मैदानावर २०१६ साली इंग्लंडविरूद्ध १६१ धावांची भागीदारी केली होती. तर आज राहुल आणि मयंक यांनी ११७ धावांची भागीदारी केली.
राहुल-मयंक जोडीने आणखीही काही विक्रम केले. राहुल मयंक जोडी दक्षिण आफ्रिकेत शतकी सलामी भागीदारी करणारी तिसरी भारतीय जोडी ठरली. याआधी वासिम जाफर-दिनेश कार्तिक यांनी २००७ साली १५३ धावांची तर गौतम गंभीर - विरेंदर सेहवागने २०१० साली १३७ धावांची सलामी दिली होती. याशिवाय, गेल्या ५२ डावांमध्ये केवळ दुसऱ्यांदा सेंच्युरियनच्या मैदानावर पाहुण्या संघाच्या सलामीवीरांनी शतकी भागीदारी करण्याचा पराक्रम केला.
Web Title: Ind vs SA 1st test Live Updates KL Rahul Mayank Agarwal Record Team India Karnataka openers put century partnership
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.