KL Rahul Test Hundred , IND vs SA 1st test: भारतीय संघाने पहिल्या कसोटीत खराब सुरूवात केल्यानंतर केएल राहुलने दमदार शतकाच्या जोरावर २४५ धावांची मजल मारली. वरची फळी आणि मधली फळी अपयशी ठरली असली तरी केएल राहुलने मात्र आपला संयमी खेळ आणि शांत स्वभाव याचा योग्य मेळ साधत उपयुक्त असे शतक ठोकले. पहिल्या दिवसअखेर ७० वर नाबाद राहिलेल्या राहुलने दुसऱ्या दिवशी पहिल्या तासाभराच्या खेळातच शतक पूर्ण केले. त्यानंतर मात्र १०१ धावांवर तो त्रिफळाचीत झाला. भारताला २४५ धावांत गुंडाळण्यात आफ्रिकेच्या कगिसो रबाडाच्या ५ विकेट्सचा मोठा वाटा राहिला.
केएल राहुलचे विक्रमी शतक
केएल राहुलने दमदार शतक ठोकत दोन महत्त्वाचे विक्रम केले. गेल्या वेळी आफ्रिका दौऱ्यावर असताना राहुलने सेंच्युरियनच्या मैदानावर दमदार शतक ठोकले होते. तो सामना बॉक्सिंग डे डेस्ट म्हणजेच २६ ते ३० डिसेंबरच्या काळात खेळला गेला. आजचा सामना देखील बॉक्सिंग डे टेस्ट आहे. त्यामुळे सेंच्युरियनच्या मैदानावर बॉक्सिंग डे टेस्टमध्ये दोन शतक करणारा केएल राहुल हा एकमेव पाहुणा फलंदाज ठरला.
आणखी एक विक्रम
राहुलने जागतिक फलंदाजांच्या यादीत आपली छाप पाडलीच, पण त्यासोबतच भारतीय विकेट किपरकडून आफ्रिका दौऱ्यावर सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा रेकॉर्डही त्याने आपल्या नावे केला. याआधी ऋषभ पंत याने नाबाद १०० धावांची खेळी होती. पण राहुलने १०१ धावा करत हा विक्रम मोडला आणि नवा विक्रम प्रस्थापित केला.
असा रंगला पहिला डाव
प्रथम फलंदाजी करताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा ५ धावा काढून बाद झाला. युवा यशस्वी जैस्वाल १७ तर शुबमन गिल २ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर जोडीने अनुभवाच्या बळावर ६८ धावांची भर घातली. पण संघाची शंभरी गाठण्याआधीच अय्यर ३१ धावांवर माघारी परतला. त्याने ३ चौकार आणि २ षटकार मारले. पाठोपाठ विराट कोहलीदेखील ५ चौकारांसह ३८ धावांवर बाद झाला. शार्दुल ठाकूरने २४ धावांची झुंज दिली. पण रविचंद्रन अश्विन (८) आणि जसप्रीत बुमराह (१), मोहम्मद सिराज (५) झटपट बाद झाले.
केएल राहुलने मात्र भारतीय संघाची लाज राखली. त्याने एका बाजूने शांत व संयमी खेळी केली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबेपर्यंत केएल राहुलने खिंड लढवत नाबाद ७० धावा केल्या. त्यापुढे दुसऱ्या दिवशी त्याने झटपट धावा करत १३३ चेंडूत शतक गाठले. अखेर १४ चौकार आणि १ षटकार यांच्या सहाय्याने त्याने १०१ धावांची खेळी केली. तो बाद झाल्यावर भारताचा डावही २४५ धावांवर संपुष्टात आला. आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने ५, नांद्रे बर्गरने ३ तर मार्को येन्सन, कोईत्झे यांनी १-१ बळी टिपला.