Join us  

गडगडलेल्या टीम इंडियाला 'राहुल'चा आधार; ठोकलं झुंजार अर्धशतक, रबाडाचे ५ बळी

भारताची पहिल्या दिवसअखेर द्विशतकी मजल, पावसामुळे लवकर संपला दिवसाचा खेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 8:28 PM

Open in App

KL Rahul , IND vs SA 1st test: भारतीय संघाची पहिल्या कसोटीतील सुरूवात खराब झाली. पहिल्या दिवशी पावसामुळे ५९ षटकांनंतर खेळ थांबवण्यात आला. कगिसो रबाडाने पाच बळी टिपले तर भारताने दिवसअखेर ८ बाद २०८ धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून केएल राहुलने एकट्याने खिंड लढवत, नाबाद ७० धावा केल्या. वरची फळी आणि मधली फळी अपयशी ठरली. केएल राहुल वगळता इतर कोणताही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. रोहित, शुबमन, यशस्वी यांसारखे खेळाडू झटपट बाद झाले. तर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर हे दोघे चांगली सुरूवात मिळूनही आपला दम दाखवू शकले नाहीत. अशा परिस्थितीत उपकर्णधार केएल राहुलने दमदार फलंदाजी केली. त्याने आपल्या संघाला तिसऱ्या सत्रापर्यंत झुंजण्याचे सामर्थ्य दिले आणि मैदानात उभा राहिला. त्याच्या झुंजार अर्धशतकामुळेच भारताला द्विशतकी मजल मारता आली.

प्रथम फलंदाजी करताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा ५ धावा काढून बाद झाला. यशस्वी जैस्वालने थोडीशी आक्रमक सुरूवात केली होती, पण तो देखील १७ धावांवर बाद झाला. त्याने ४ चौकार खेचले. युवा शुबमन गिल २ धावांवर धावचीत झाला. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर जोडीने संयमी खेळी केली. त्यांनी ६८ धावांची भागीदारी केली. पण संघाची शंभरी गाठण्याआधीच अय्यर ३१ धावा काढून माघारी परतला. त्याने ३ चौकार आणि २ षटकार मारले.

विराट कोहलीने एक बाजू लावून धरत फलंदाजीचा प्रयत्न केला होता, पण त्यालाही मोठी खेळी करता आली नाही. विराट ५ चौकारांसह ३८ धावा काढून माघारी परतला. केएल राहुलने मात्र भारतीय संघाची लाज राखली. त्याने एका बाजूने शांत व संयमी खेळी सुरू ठेवली. रविचंद्रन अश्विन (८) आणि जसप्रीत बुमराह (१) झटपट बाद झाले. शार्दुल ठाकूरने धावसंख्येला थोडा हातभार लावला. त्याने ३ चौकारांसह २४ धावा केल्या. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ थांबेपर्यंत केएल राहुलने खिंड लढवली. त्याने १०५ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७० धावा केल्या.  

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकालोकेश राहुलरोहित शर्माविराट कोहली