Join us  

IND vs SA 2nd ODI Live Updates : श्रेयस अय्यरचे शतक, इशान किशनच्या ९३ धावा; भारताची मालिकेत १-१ ने बरोबरी

IND vs SA 2nd ODI Live Updates : इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, परंतु श्रेयसने शतक झळकावून भारताच्या विजयाचा आनंद द्विगुणित केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2022 9:04 PM

Open in App

India vs South Africa 2nd ODI Live Updates :  इशान किशन ( Ishan Kishan) आणि श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या १५५ चेंडूंत १६१ धावांच्या भागीदारीने भारताचे आव्हान कायम राखले. इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, परंतु श्रेयसने शतक झळकावून भारताच्या विजयाचा आनंद द्विगुणित केला. दक्षिण आफ्रिकेवर दुसऱ्या वन डे सामन्यात ७ विकेट्स राखून विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. मोहम्मद सिराजने गोलंदाजीत कमाल करताना ३ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.

Shreyas Iyer ने एकही षटकार न खेचता झळकावले शतक 

भारताचे सलामीवीर पुन्हा अपयशी ठरले. कर्णधार शिखर धवन ( १३) व शुबमन गिल ( २८) यांना अनुक्रमे वेन पार्नेल व कागिसो रबाडा यांनी ४८ धावांवर माघारी पाठवले. इशान किशन व श्रेयस अय्यर यांनी भारताचा डाव सावरला.  इशान व श्रेयस या दोघांनी आपापले अर्धशतक अनुक्रमे ६० व ५० चेंडूंत पूर्ण केले. ८६ धावांवर असणाऱ्या इशानची रिटर्न कॅच रबाडाने टाकली. इशान आज शतक झळकावेल असेच वाटत होते, परंतु माशी शिकंली. बीजॉर्न फॉर्च्युनने त्याची विकेट घेतली. इशान ८४ चेंडूंत ४ चौकार व ७ षटकारांसह ९३ धावांवर माघारी परतला.

इशानचे शतक हुकले असले तरी श्रेयसने ती उणीव भरून काढली. या दोघांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डेत तिसऱ्या विकेट्ससाठी सर्वोत्तम भागीदारी करणाऱ्या सचिन तेंडुलकर व राहुल द्रविड ( १५८ धावा) यांचा विक्रम मोडला. विराट कोहली व अजिंक्य रहाणे १८९ धावांसह अव्वल स्थानावर आहेत. श्रेयस १११ चेंडूत १५ चौकारांच्या मदतीने ११३ धावांवर नाबाद राहिला. भारताने ४५.५ षटकांत ३ बाद २८२ धावा करून भारताला ७ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.

एडन मार्कराम व रिझा हेंड्रिक्स यांनी बाजी पलटवली... क्विंटन डी कॉक ( ५) तिसऱ्या षटकात बाद झाल्यानंतर भारताला सामन्यावर पकड घेता आली असती, परंतु यानेमन मलान ( २५) व रिझा हेंड्रिक्स यांनी डाव सावरला. पदार्पणवीर शाहबाज अहमदने ही ३३ धावांची भागीदारी तोडली. हेंड्रिक्स व एडन मार्कराम या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १२९ चेंडूंत १२९ धावा जोडल्या. हेंड्रिक्स ७६ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ७४ धावांवर माघारी परतला. हेनरिच क्लासेन ( ३०) व मार्कराम यांची ४६ धावांची भागीदारी कुलदीप यावदने संपुष्टात आणली. पुढच्याच षटकात वॉशिंग्टन सुंदरने  ८९ चेंडूंत ७९ धावा ( ७ चौकार व १ षटकार) करणाऱ्या मार्करामला माघारी पाठवले. वेन पार्नेल व डेव्हिड मिलर यांनी झटपट ४१ धावा जोडल्या. शार्दूल ठाकूरने १६ धावा करणाऱ्या पार्नेलला बाद केले.  मिलरने ४९व्या षटकात दोन खणखणीत चौकार खेचले. सिराजने शेवटच्या षटकात केवळ ३ धावा दिल्या. आफ्रिकेला ७ बाद २७८ धावांवर समाधानी राहावे लागले. मिलर ३५ धावांवर नाबाद राहिला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाश्रेयस अय्यरइशान किशनमोहम्मद सिराज
Open in App