India vs South Africa, 2nd ODI Live Updates : शिखर धवन ( Shikhar Dhawan) आणि लोकेश राहुल ( KL Rahul) यांनी दुसऱ्या वन डे सामन्यांत भारताला दमदार सुरुवात करून दिली. पण बिनबाद ६३ वरून भारताची गाडी २ बाद ६४ अशी घसरली. पण, लोकेश राहुल व रिषभ पंत ( Rishabh Pant) या जोडीनं टीम इंडियाच्या डावाला आकार दिला. या दोघांनी जवळपास सहाच्या सरासरीनं धावा करताना शतकी भागीदारी केली. या दोघांना नशीबाची साथही मिळाली. लोकेशला ८ व ४६ धावांवर असताना जीवदान मिळालं. पण, धवन-विराट सारखेच लोकेश-रिषभ पाठोपाठ माघारी परतले. पुन्हा एकदा शार्दूल ठाकूरनं ( Shardul Thakur) अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना संघाला मोठा पल्ला गाठून दिला.
नाणेफेकीचा कौल बाजूनं लागल्यानंतर लोकेश राहुलनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन २९ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला विराट कोहली पुढच्याच षटकात केशव महाराजच्या गोलंदाजीवर भोपळ्यावर बाद झाला. रिषभ पंत व लोकेश यांनी भारताचा डाव सावरला. रिषभनं ४३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. वन डेतील त्याचे हे चौथे अर्धशतक ठरले. लोकेशनं ७१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. ३२व्या षटकात ही भागीदारी संपुष्टात आली. सिसांडा मगालाच्या गोलंदाजीवर लोकेश ५५ धावांवर झेलबाद झाला आणि रिषभसह त्याची ११५ धावांची भागीदारी तुटली. त्यानंतर पुढच्याच षटकात तब्रेझ शम्सीच्या गोलंदाजीवर जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात रिषभ झेलबाद झाला. यावेळी मार्करामनं कोणतीच चूक केली नाही. रिषभनं ७१ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांच्या मदतीनं ८५ धावा केल्या.
३३व्या षटकात रिषभ माघारी परतल्यानंतर श्रेयस अय्यर व वेंकटेश अय्यर यांच्यावर पुढील १७ षटकं खेळून काढून स्वतःला सिद्ध करण्याची संधी होती. पण, श्रेयस ३७व्या षटकावर ११ धावांत शम्सीच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन माघारी परतला. वेकंटेश १५ धावांवर असताना रॅसी व्हॅन डेर ड्यूसेननं त्याचा झेल सोडला. वेंकटेश आणि शार्दूल ठाकूर यांनी ३४ धावांची भागीदारी केली. वेंकटेश चांगल्या टचमध्ये दिसत असताना क्विंटन डी कॉकनं पुन्हा एकदा अप्रतिम स्टम्पिंग करून त्याला माघारी पाठवले. अँडीले फेहलुकवायोच्या गोलंदाजीवर वेंकटेश २२ धावांवर स्टम्पिंग झाला. दूसऱ्याबाजूनं शार्दूलची फटकेबाजी सुरू राहिली. आर अश्विननेही जरा हात मोकळे केले. भारतानं ६ बाद २८७ धावांचा डोंगर उभा केला. शार्दूल ४०, तर अश्विन २५ धावांवर नाबाद राहिले.
संक्षिप्त धावफलक - भारत ६ बाद २८७ धावा ( रिषभ पंत ८५, लोकेश राहुल ५५, शार्दूल ठाकूर ४०*, शिखर धवन २९, आर अश्विन २५*; तब्रेझ शम्सी २-५७)