India vs South Africa 2nd ODI Live Updates : भारतीय गोलंदाजांनी मधली काही षटकं वगळली तर दुसऱ्या वन डे सामन्यात चांगली गोलंदाजी केली. मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj ) आजच्या सामन्यातील स्टार ठरला. त्याने ३८ धाव देताना ३ विकेट्स घेतल्या. अखेरच्या षटकात त्याने केवळ ३ धावा देताना दक्षिण आफ्रिकेला ७ बाद २७८ धावांवर समाधानी राहण्यास भाग पाडले. सिराजने एक अफलातून झेलही टिपला, परंतु एवढं सगळ करूनही तो ट्रोल होतोय. त्याला कारणही तसेच आहे.
क्विंटन डी कॉक ( ५) तिसऱ्या षटकात बाद झाल्यानंतर भारताला सामन्यावर पकड घेता आली असती, परंतु यानेमन मलान ( २५) व रिझा हेंड्रिक्स यांनी डाव सावरला. पदार्पणवीर शाहबाज अहमदने ही ३३ धावांची भागीदारी तोडली. हेंड्रिक्स व एडन मार्कराम या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १२९ चेंडूंत १२९ धावा जोडल्या. सिराजला ही जोडी तोडण्यात यश मिळालं. हेंड्रिक्स ७६ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ७४ धावांवर माघारी परतला. हेनरिच क्लासेन व मार्कराम यांची ४६ धावांची भागीदारी कुलदीप यावदने संपुष्टात आणली. क्लासेन २६ चेंडूंत २ चौकार व २ षटकार खेचून ३० धावांवर माघारी परतला. पुढच्याच षटकात वॉशिंग्टन सुंदरने कमाल केली. त्याने ८९ चेंडूंत ७९ धावा ( ७ चौकार व १ षटकार) करणाऱ्या मार्करामला माघारी पाठवले. या दोन षटकानंतर टीम इंडियाने पुनरागमन केले.
वेन पार्नेल व डेव्हिड मिलर यांनी झटपट ४१ धावा जोडल्या. शार्दूल ठाकूरने १६ धावा करणाऱ्या पार्नेलला बाद केले. मिलरने ४९व्या षटकात दोन खणखणीत चौकार खेचले. सिराजने शेवटच्या षटकात केवळ ३ धावा दिल्या. आफ्रिकेला ७ बाद २७८ धावांवर समाधानी राहावे लागले. मिलर ३५ धावांवर नाबाद राहिला.
सिराजचा नेमका किस्सा काय झाला?४८ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर केशव महाराजकडून फटका चूकला अन् चेंडू यष्टिरक्षक संजू सॅमसनकडे गेला. संजूने तो लगेच सिराजकडे फेकला. नॉन स्ट्रायकर मिलर पुढे आल्याचे पाहताच सिराजने रन आऊट करण्याचा प्रयत्न केला. पण, चेंडू यष्टींना न लागता चौकार केला. त्यानंतर सिराजने अम्पायरकडे डेथ बॉलची मागणी केली, परंतु अम्पारयने बाय च्या चार धावा आफ्रिकेला दिल्या. त्यावरून शिखर धवनने नाराजी व्यक्त केली. अम्पायरने नियमावर बोट ठेऊन सिराजची बोलती बंद केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"