India vs South Africa, 2nd ODI Live Updates : शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी दुसऱ्या वन डे सामन्यांत भारताला दमदार सुरुवात करून दिली. पण बिनबाद ६३ वरून भारताची गाडी २ बाद ६४ अशी घसरली. पण, लोकेश राहुल व रिषभ पंत या जोडीनं टीम इंडियाच्या डावाला आकार दिला. या दोघांनी जवळपास सहाच्या सरासरीनं धावा करताना शतकी भागीदारी केली. या दोघांना नशीबाची साथही मिळाली. लोकेशला ८ व ४६ धावांवर असताना जीवदान मिळालं. पण, धवन-विराट सारखेच लोकेश-रिषभ पाठोपाठ माघारी परतले. दोघांनी अर्धशतकी खेळी केली. रिषभचा खेळ आज सॉलिड झाला अन् त्यानं २००१मध्ये राहुल द्रविडनं नोंदवलेला मोठा पराक्रम मोडला.
नाणेफेकीचा कौल बाजूनं लागल्यानंतर लोकेश राहुलनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मागील लढतीत ७९ धावांची खेळी करणाऱ्या शिखरनं पुन्हा एकदा आक्रमक सुरुवात करून दिली. लोकेशनंही त्याला चांगली साथ दिली. पण १२व्या षटकात एडन मार्करामनं टीम इंडियाला पहिला धक्का दिला. धवन २९ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला विराट कोहली पुढच्याच षटकात केशव महाराजच्या गोलंदाजीवर भोपळ्यावर बाद झाला.
रिषभ पंत व लोकेश यांनी भारताचा डाव सावरला. पण, या जोडीतही गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. केशव महाराजनं टाकेलल्या १५व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर रिषभनं मिड विकेटच्या दिशेनं फटका मारला अन् तोपर्यंत लोकेश क्रिज सोडून रिषभच्या इथे पोहोचला होता. पण, रिषभ जागेवरून हलला नाही. दोन्ही फलंदाज एकाच एंडला असूनही आफ्रिकेला विकेट मिळवता आली नाही. टेम्बा बवुमानं फेकलेला चेंडू महाराजला पकडता आला नाही आणि त्यानं धावबाद करण्याची संधी गमावली.
रिषभनं ४३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. वन डेतील त्याचे हे चौथे अर्धशतक ठरले. लोकेशला ४६ धावांवर जीवदान मिळाले, यावेळेस मार्करामनं त्याचा झेल सोडला. त्यानंतर सावध खेळ करून लोकेशनं ७१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं आणि रिषभसोबत तिसऱ्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारीही पूर्ण केली. ३२व्या षटकात ही भागीदारी संपुष्टात आली. सिसांडा मगालाच्या गोलंदाजीवर लोकेश ५५ धावांवर झेलबाद झाला आणि रिषभसह त्याची ११५ धावांची भागीदारी तुटली. त्यानंतर पुढच्याच षटकात तब्रेझ शम्सीच्या गोलंदाजीवर जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात रिषभ झेलबाद झाला. यावेळी मार्करामनं कोणतीच चूक केली नाही. रिषभनं ७१ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांच्या मदतीनं ८५ धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेत भारताच्या यष्टिरक्षकानं वन डे क्रिकेटमध्ये केलेली ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. रिषभचीही वन डे तील ही सर्वोत्तम खेळी आहे. यापूर्वी २००१मध्ये राहुल द्रविडनं यजमानांविरुद्ध ७७ धावा केल्या होत्या. त्यानंतर २०१३मध्ये महेंद्रसिंग धोनीनं ६५ धावा आणि २००३मध्ये राहुल द्रविडनं ६२ ( वि. इंग्लंड) असा क्रम येतो. साबा करिम यांनी १९९७मध्ये ५५ धावा केल्या होत्या.