India vs South Africa, 2nd ODI Live Updates : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात शून्यावर बाद झाला. शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली, परंतु धवन व विराट पाठोपाठ माघारी परतले. लोकेश व रिषभ पंत यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून संघाचा डाव सावरला. पण, विराट शून्यावर बाद होऊन नकोसे विक्रम नावावर करून बसला. तो सुरेश रैना व वीरेंद्र सेहवाग यांच्या पंक्तित जाऊन बसला. भारताकडून वन डे क्रिकेटमध्ये १४वेळा शून्यावर बाद होण्याच्या विक्रमात त्यानं रैना, सेहवाग व झहीर खान यांच्याशी बरोबरी केली.
विराटनं यासह रोहित शर्मा व राहुल द्रविड ( प्रत्येकी १३) यांना मागे टाकले. या नकोशा विक्रमात सचिन तेंडुलकर २० वेळा शून्यावर बाद होऊन आघाडीवर आहे. त्यानंतर जवागल श्रीनाथ ( १९), अनिल कुंबळे ( १८), युवराज सिंग ( १८), हरभजन सिंग ( १७), सौरव गांगुली ( १६) यांचा क्रमांक येतो. सर्व फॉरमॅटचा विचार केल्यास भारताकडून सचिन तेंडुलकर सर्वाधिक ३४ वेळा शून्यावर बाद झाला आहे. त्यानंतर विराट व सेहवाग ( प्रत्येकी ३१), सौरव गांगुली ( २९) व युवराज सिंग ( २६) अशी क्रमवारी येते.
मागील दोन वर्षांत विराट प्रथमच वन डे क्रिकेटमध्ये शून्यावर बाद झाला आहे. २०१९मध्ये वेस्ट इंडिदविरुद्ध तो भोपळा फोडण्यात अपयशी ठरला होता. २०१०मध्ये तो पहिल्यांदा झिम्बाब्वेविरुद्ध शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर २०१०मध्ये दोन वेळा, २०११ मध्ये २ वेळा, २०१२ मध्ये १ वेळा, २०१३मध्ये ३ वेळा, २०१४ मध्ये १ वेळा आणि २०१७मध्ये २ वेळा शून्यावर बाद झाला आहे.