IND vs SA 2nd ODI : दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या वन डे सामन्यात जबरदस्त खेळ करून भारताविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवली. गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर आफ्रिकेने भारताला २११ धावांत गुंडाळले. त्यानंतर टॉनी डे जॉर्जीचे शतक आणि रिझा हेंड्रिक्सच्या अर्धशतकाच्या जोरावर सहज विजय मिळवला.
सलामीवीर ऋतुराज गायकवाड ( ४), तिलक वर्मा ( १०) हे आज अपयशी ठरले. कर्णधार लोकेश राहुल व साई सुदर्शन यांनी चांगली भागीदारी केली. साईने ८३ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ६२ धावा केल्या. लोकेश खेळपट्टीवर उभा असताना दुसऱ्या बाजूने संजू सॅमसन ( १२) व रिंकू सिंग ( १७) यांनी निराश केले. लोकेश ६४ चेंडूंत ५६ धावांवर बाद झाला. अर्शदीप सिंगने १८ धावा करून भारताला २११ धावांपर्यंत पोहोचवले. भारताचा संपूर्ण संघ ४६.२ षटकांत तंबूत परतला. नांद्रे बर्गरने तीन, ब्युरन हेंड्रिक्स व केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात टॉनी डे जॉर्जी व रिझा हेंड्रिक्स यांनी सामना एकतर्फी केला. दोघांनी २७.५ षटकांत १३० धावांची भागीदारी केली. अर्शदीप सिंगने ही जोडी तोडताना ८१ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ५२ धावा करणाऱ्या हेंड्रिक्सला बाद केले. कारकीर्दितील चौथा वन डे सामना खेळणाऱ्या जॉर्जीने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने वन डेतील त्याचे पहिले शतक झळकावले. जॉर्जीला रॅसी व्हॅन डेर ड्युसेनची ( ३६) चांगली साथ मिळाली आणि दोघांनी ७६ धावांची भागीदारी केली. रिंकू सिंगने ड्युसेनची विकेट घेतली. आफ्रिकेने ४२.३ षटकांत २ बाद २१५ धावा करून विजय मिळवला. जॉर्जी १२२ चेंडूंत ९ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने ११९ धावांवर नाबाद राहिला.
Web Title: IND vs SA 2nd ODI : Maiden ODI Century for Tony de Zorzi, South Africa won 2nd ODI, beat India by 8 wickets and level the series 1-1
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.