पार्ल : कसोटी मालिकेत आघाडी घेतल्यानंतरही भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १-२ असा पराभव पत्करावा लागला. यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत चांगल्या सुरुवातीनंतरही भारताने बुधवारी हातातील सामना गमावला. यजमान द. आफ्रिकेविरुद्ध मालिकेत ०-१ असे पिछाडीवर पडल्यानंतर भारताला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी शुक्रवारी होणारा दुसरा एकदिवसीय सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल. यासाठी भारताला फलंदाजीत प्रामुख्याने कामगिरी उंचवावी लागेल.
सलामीवीर शिखर धवन आणि माजी कर्णधार विराट कोहली या अनुभवी फलंदाजांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी नांगी टाकली. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघाचे कर्णधारपद भूषवीत असलेला लोकेश राहुलही अपयशी ठरला. तसेच श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांना मधल्या फळीत अपेक्षित कामगिरी करता आली नाही. पदार्पण केलेल्या व्यंकटेश अय्यरमध्ये असलेली अनुभवाची कमतरता दिसून आली. भारताच्या मधल्या फळीतील अपयश गेल्या अनेक वर्षांपासून चिंतेचा विषय ठरला आहे. २०१९ सालच्या विश्वचषक स्पर्धेआधीपासून भारताला मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज गवसलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय फलंदाजी आघाडीच्या तीन फलंदाजांवरच अवलंबून असल्याचे दिसून येत आहे.
अष्टपैलू म्हणून व्यंकटेशला पदार्पणाची संधी दिली खरी. मात्र, त्याला एकही षटक टाकण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याला संघात कशासाठी स्थान देण्यात आले, हे एक कोडे ठरले आहे. आफ्रिकेचा कर्णधार तेम्बा बवुमा आणि रासी वॅन डुसेन हे सर्वच गोलंदाजांवर भारी ठरत असतानाही व्यंकटेशला गोलंदाजी देण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्याच वेळी सामन्यात अष्टपैलू कामगिरी केली ती शार्दूल ठाकूरने. त्याने बऱ्यापैकी मारा केल्यानंतर धावांचा पाठलाग करताना नाबाद अर्धशतकही ठोकले. त्यामुळेच राहुलच्या नेतृत्वावरही प्रश्न निर्माण होत आहेत.
दोन्ही संघांच्या फिरकीपटूंच्या गोलंदाजीतही बराच फरक पाहण्यास मिळाला. आफ्रिकेचा कर्णधार बवुमाने कल्पकतेने गोलंदाजांचा वापर करताना पहिले षटक ऑफ स्पिनर एडेन मार्करमला दिले आणि त्यानेच राहुलचा बळीही मिळवला. रविचंद्रन आश्विन आणि युझवेंद्र चहल यांनी मिळून २० षटकांमध्ये १०६ धावा देत केवळ एक बळी घेतला. दुसरीकडे आफ्रिकेच्या मार्करम, तबरेझ शम्सी आणि केशव महाराज यांनी २६ षटकांमध्ये १२६ धावा देत ४ बळी घेतले. त्यामुळे भारतीय फिरकीपटूंनाही मोठी सुधारणा करावी लागेल.
भारत-दक्षिण आफ्रिका प्रतिस्पर्धी संघ
भारत : लोकेश राहुल (कर्णधार), जसप्रीत बुमराह, शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत, इशान किशन, युझवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जयंत यादव आणि नवदीप सैनी
दक्षिण आफ्रिका : तेम्बा बावुमा (कर्णधार), केशव महाराज, क्विंटन डिकॉक, जुबैर हमजा, मार्को येनसेन, जनेमन मलान, सिसांडा मगला, एडेन मार्करम, डेविड मिल्लर, लुंगी एनगिडी, वायने पर्नेल, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, तबरेझ शम्सी, रासी वॅन डर डुसेन, जॉर्ज लिंडे आणि काएल वेरेने.
Web Title: IND vs SA 2nd ODI Team India aims at improved show with series on the line
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.