Cape Town Pitch । केपटाउन: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाउन येथे दुसरा कसोटी सामना सुरू आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस असून, बुधवारी सामन्याच्या पहिल्याच दिवशी २३ विकेट पडल्या. यजमान आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अवघ्या ५५ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताला आपल्या पहिल्या डावात १५३ धावा करता आल्या. लक्षणीय बाब म्हणजे भारताचे सहा फलंदाज सलग शून्यावर बाद होत गेले. १५३ धावांवर ४ बाद असताना याच धावसंख्येवर भारतीय संघ सर्वबाद झाला. दिवसाच्या तिसऱ्या सत्रात दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी आपल्या दुसऱ्या डावात ३ गडी गमावून ६२ धावा केल्या होत्या.
घरच्या मैदानावर आपल्या संघाची ही अवस्था पाहून यजमान संघाच्या प्रशिक्षकांनी खेळपट्टीबाबत मोठे विधान केले. दक्षिण आफ्रिकेचे फलंदाजी प्रशिक्षक अश्वेल प्रिन्स यांनी सांगितले की, न्यूलँड्सची खेळपट्टी पहिल्या दिवसापासून अशी असेल असे वाटले नव्हते. कारण इथे चेंडू खूप उसळी घेत होता. खेळपट्टीवरील अनियमित उसळी आश्चर्यकारक असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोचकडून खेळाडूंची पाठराखण "मी या मैदानावर भरपूर क्रिकेट खेळलो आहे. प्रशिक्षक म्हणूनही मी इथे बऱ्यापैकी वेळ घालवला आहे. पहिल्या दिवसापासून इतकी वेगवान खेळपट्टी मी कधीच पाहिली नाही. सामान्यत: सामन्याच्या दुसऱ्या दिवसापासून इथे चेंडूचा वेग वाढल्याचे मी पाहिले होते... या खेळपट्टीवर फलंदाजीत सुधारणा करण्यासाठी उसळीची आवश्यकता आहे. परंतु, मला वाटते की सध्या इथे चेंडू अतिरिक्त उसळी घेत आहे. चेंडू अतिरिक्त उसळी घेत असल्यामुळेच या खेळपट्टीवर दोन्ही संघांच्या खेळाडूंना फलंदाजी करता आली ", असेही त्यांनी सांगितले.
दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि मुकेश कुमार.
दुसऱ्या कसोटीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ -डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्करम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को जान्सेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, नांद्रे बर्गर आणि लुंगी एनगिडी.