IND vs SA 2nd T20I - दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. सूर्यकुमार यादव व रिंकू सिंग यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने १९.३ षटकांत १८० धावा उभ्या केल्या. पण, पावसामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर १५ षटकांत १५२ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवले गेले. आफ्रिकेने ५ विकेट्स राखून हा सामना जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. या सामन्यात भारताच्या रिंकू सिंगने ( Rinku Singh) त्याच्या आक्रमक फटकेबाजीने सर्वांना प्रभावित केले. पण, सामन्यानंतर त्याने माफी मागितली.
शुबमन गिल व यशस्वी जैस्वाल हे दोन्ही सलामावीर शून्यावर बाद झाल्यानंतर तिलक वर्माने २९ धावा चोपल्या. त्याने सूर्यकुमार यादवसह भारताचा डाव सावरला. सूर्याने नंतर रिंकू सिंगला सोबतिला घेऊन चांगली फटकेबाजी केली. ३६ चेंडूंत ५६ धावा करून सूर्यकुमार माघारी परतल्यानंतर रिंकूने दणदणीत खेळ केला. त्याने एडन मार्करामच्या एका षटकात सलग दोन षटकार खेचले आणि त्यापैकी एक चेंडू साईड स्क्रीनच्या वर असलेल्या प्रेस बॉक्सच्या काचेवर जाऊन आदळला. त्यामुळे काचेला भेगा गेल्या. रिंकू ३९ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ६८ धावांवर नाबाद राहिला.