India vs South Africa 2nd T20I Live Updates : अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार ( Bhuvneshwar Kumar ) याच्याकडून पहिल्या ६ षटकांत तीन षटकं फेकून घेण्याचा निर्णय योग्य ठरला. कर्णधार रिषभ पंतचे डावपेच आज यशस्वी ठरले आणि ते पाहून महान फलंदाज सुनील गावस्कर यांनीही त्याचे कौतुक केले. भुवीने पहिल्या ६ षटकांत पॉवरफूल कामगिरी करताना दक्षिण आफ्रिकेला बॅकफूटवर फेकले आहे. त्याने दिलेल्या धक्क्यांमुळे भारताने सामन्यावर मजबूत पकड घेतली. मागील सामन्यातील मॅचविनर Rassie van der Dussen याला १ धावेवर भुवीने त्रिफळा उडवून माघारी जाण्यास भाग पाडले.
इशान किशन ( Ishan Kishan ), दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik) व श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) वगळता भारताच्या फलंदाजांना आज काही खास कामगिरी करता आली नाही. कर्णधार रिषभ पंत ( ५) व उप कर्णधार हार्दिक पांड्या ( ९) हे एकेरी धावसंख्येवर माघारी परतले. इशान-श्रेयस यांची ४५ धावांची भागीदारी वगळल्यास भारताच्या अन्य फलंदाजांना जास्त धावा जोडता आल्या नाही. कार्तिकने पुन्हा एकदा मॅच फिनिशर इनिंग्ज खेळून भारताला समाधानकारक पल्ला गाठून दिला.
इशान २१ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३४ धावांवर बाद झाला. अय्यरने ३५ चेंडूंत ४० धावा केल्या. अक्षर पटेल ( १०) अपयशी ठरला. पहिल्या १६ चेंडूंत ९ धावा करणाऱ्या दिनेश कार्तिकने तुफान फटकेबाजी केली. त्याने पुढील ५ चेंडूंत २१ धावा कुटल्या. कार्तिकच्या २१ चेंडूंत नाबाद ३० धावांच्या जोरावर भारताने ६ बाद १४८ धावा केल्या. हर्षल पटेलने १२ धावा केल्या.
क्विंटन डी कॉकच्या अनुपस्थितीत सलामीला आलेल्या रिझा हेड्रीक्सला पहिल्याच षटकात भुवीने माघारी पाठवले. अप्रतिम चेंडूवर भुवीने त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर तिसऱ्या षटकात ड्वेन प्रेटोरियसला ( ४) भुवीने बाद केले. आवेश खानने अप्रतिम झेल घेतला. भुवीचा भेदक मारा पाहून रिषभने सहावे षटकही भूवीलाच टाकायला सांगितले. त्याचा हा डाव यशस्वी ठरला. पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांची निर्दयीपणे धुलाई करणाऱ्या रॅसी व्हॅन डेर ड्युसेनचा ( १) त्रिफळा उडवून भुवीने भारताला मोठे यश मिळवून दिले. भुवीने पहिल्या ३ षटकांत १० धावा देताना आफ्रिकेच्या तीन विकेट्स घेतल्या.
भारताकडून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंत भुवीने ६२ बळींसह तिसरे स्थान पटकावले. त्याने आर अश्विनला ( ६१) मागे टाकले. युझवेंद्र चहल ( ६८) व जसप्रीत बुमराह ( ६७) हे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ट्वेंटी-२० त पहिल्या षटकांत भुवीने ३१ विकेट्स घेत दुसरे स्थान पटकावले. सोहैल तन्वीर ३६ विकेट्ससह आघाडीवर आहे. मोहम्मद आमीर ( ३०) व डेव्हिड विली ( ३०) यांना भुवीने आज मागे टाकले.