India vs South Africa, 2nd T20I Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात ४५८ धावांचा पाऊस पडला. भारताने उभ्या केलेल्या २३७ धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने २२१ धावा उभ्या केल्या. भारताने १६ धावांनी हा सामना जिंकून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर ट्वेंटी-२० मालिका जिंकणारा रोहित शर्मा ( Rohit Sharma) हा भारताचा पहिला कर्णधार बनला. पण, याचवेळी रोहितच्या समर्पणाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय... फलंदाजी करताना बोटावर चेंडू आदळूनही रोहितने ४३ धावा केल्या, तर क्षेत्ररक्षण करताना नाकातून रक्त वाहत असूनही तो मैदानावर उभा राहिलेला दिसला...
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने इतिहास रचला; David Miller, क्विंटन डी कॉकची टफ फाईट!
लोकेश राहुल ( ५७ ) व रोहित शर्मा ( ४३) या जोडीने ९६ धावांची भागीदारी करून भारताला चांगली सुरुवात करून दिली. सूर्याकुमार यादव व विराट कोहली यांनी ४२ चेंडूंत १०२ धावांची भागीदारी केली. सूर्याने २२ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांसह ६१ धावांची वादळी खेळी केली. विराटला २८ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ४९ धावांवर नाबाद राहावे लागले. कार्तिकने ७ चेंडूंत १७ धावा करताना भारताला ३ बाद २३७ धावांचा पल्ला गाठून दिला.
अर्शदीप सिंगने आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाला ( ०) व रिली रोसोवू ( ०) यांना माघारी पाठवून भारताला मोठे यश मिळवून दिले. पण, क्विंटन डी कॉकच्या सोबतीने एडन मार्करमने ( ३३) आफ्रिकेचे आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न केला होता. क्विंटन आणि डेव्हिड मिलर यांनी ८४ चेंडूंत नाबाद १७४ धावा केल्या. मिलर ४७ चेंडूंत ८ चौकार व ७ षटकारांसह १०६ धावांवर , तर क्विंटन ४८ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ६९ धावांवर नाबाद राहिला. आफ्रिकेने ३ बाद २२१ धावा केल्या.
रोहित शर्माला नेमकं काय झालं?दुसऱ्या डावात अष्टपैलू शाहबाज अहमदला बदली खेळाडू म्हणून १२व्या षटकात मैदानावर बोलावले गेले. गुवाहाटी येथील ह्युमिडिटी एवढी होती की रोहितला ती असह्य झालेली आणि त्याच्या नाकातून रक्त वाहू लागले. तरीही तो खेळपट्टीवर होता आणि गोलंदाजांना मार्गदर्शन करत होता. अखेर फिजिओंनी त्याला बोलावले आणि तो काहीकाळासाठी मैदानाबाहेर गेला. रोहितचे हे समर्पण पाहून चाहते कौतुक करत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"