India vs South Africa 2nd T20I Live Updates : इशान किशन ( Ishan Kishan ),दिनेश कार्तिक वश्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) वगळता भारताच्या फलंदाजांना आज काही खास कामगिरी करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करताना भारताच्या धावसंख्येवर लगाम लावले. कर्णधार रिषभ पंत व उप कर्णधार हार्दिक पांड्या हे एकेरी धावसंख्येवर माघारी परतले. इशान-श्रेयस यांची ४५ धावांची भागीदारी वगळल्यास भारताच्या अन्य फलंदाजांना जास्त धावा जोडता आल्या नाही. आफ्रिकेच्या गोलंदाजांचं आज विशेष कौतुक करायला हवं. दिनेश कार्तिकने ( Dinesh Karthik) पुन्हा एकदा मॅच फिनिशर इनिंग्ज खेळून भारताला समाधानकारक पल्ला गाठून दिला.
भारताला पहिल्या षटकात धक्का, कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर सलामीवीर ऋतुराज गायकवाड ( १) झेलबाद झाला. इशान किशन आक्रमक पवित्र्यातच दिसला. त्याने उत्तुंग फटके मारले, त्यात त्याला २८ धावांवर जीवदान मिळाले. पण, पुढच्याच षटकात तो झेलबाद झाला. नॉर्खियाच्या आखुड चेंडूवर इशानन पुल शॉट मारला अन् रॅसी व्हॅन डेर ड्यूसेनने डिप स्क्वेअर लेगला सहज झेल घेतला. इशान २१ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३४ धावांवर बाद झाला.
त्यानंतर श्रेयस अय्यरने मोर्चा सांभाळला. तब्रेझ शम्सीच्या पहिल्याच षटकात त्याने १४ धावा कुटल्या. पण, कर्णधार रिषभ पंत पुन्हा एकदा चूकीचा फटका मारून माघारी परतला. केशव महाराजने त्याला ( ५) बाद केले. १३व्या षटकात ३७ धावांवर अय्यरला जीवदान मिळाले. पण, पार्नेलने त्याच षटकात हार्दिक पांड्याचा ( ९) त्रिफळा उडवला. त्यापुढील षटकात ड्वेन प्रेटोरियसने अय्यरला ४० धावांवर झेलबाद केले. भारताचा निम्मा संघ ९८ धावांवर माघारी परतला. नॉर्खियाने १७व्या षटकात अक्षर पटेलचा ( १०) त्रिफळा उडवला. १६ चेंडूंत ९ धावा करणाऱ्या दिनेश कार्तिकने तुफान फटकेबाजी केली. त्याने पुढील ५ चेंडूंत २१ धावा कुटल्या. कार्तिकच्या २१ चेंडूंत नाबाद ३० धावांच्या जोरावर भारताने ६ बाद १४८ धावा केल्या. हर्षल पटेलने १२ धावा केल्या.