India vs South Africa 2nd T20I Live Updates : रॅसी व्हेन डेर ड्युसेन व डेव्हिड मिलर यांनी भारताला पहिल्या सामन्यात पराभूत केल्यानंतर आज दुसऱ्या लढतीत हेनरिच क्लासेन ( Heinrich Klaasen) स्टार ठरला. भुवनेश्वर कुमारने पॉवर प्लेमध्ये तीन धक्के देऊन आफ्रिकेची अवस्था ३ बाद २९ अशी केली. पण, आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा व क्लासेन यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. क्लासेनने ट्वेंटी-२०तील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करताना भारताला पराभूत केले. आफ्रिकेने या विजयासह मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.
इशान किशन ( Ishan Kishan ), दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik) व श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) वगळता भारताच्या फलंदाजांना आज काही खास कामगिरी करता आली नाही. कर्णधार रिषभ पंत ( ५) व उप कर्णधार हार्दिक पांड्या ( ९) हे एकेरी धावसंख्येवर माघारी परतले. इशान-श्रेयस यांची ४५ धावांची भागीदारी वगळल्यास भारताच्या अन्य फलंदाजांना जास्त धावा जोडता आल्या नाही. इशान २१ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३४ धावांवर बाद झाला. अय्यरने ३५ चेंडूंत ४० धावा केल्या. अक्षर पटेल ( १०) अपयशी ठरला. पहिल्या १६ चेंडूंत ९ धावा करणाऱ्या दिनेश कार्तिकने तुफान फटकेबाजी केली. त्याने पुढील ५ चेंडूंत २१ धावा कुटल्या. कार्तिकच्या २१ चेंडूंत नाबाद ३० धावांच्या जोरावर भारताने ६ बाद १४८ धावा केल्या. हर्षल पटेलने १२ धावा केल्या.
क्विंटन डी कॉकच्या अनुपस्थितीत सलामीला आलेल्या रिझा हेड्रीक्सला ( ४) पहिल्याच षटकात भुवीने माघारी पाठवले. त्यानंतर ड्वेन प्रेटोरियस ( ४) व रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( १) यांना बाद करून आफ्रिकेची अवस्था ३ बाद २९ अशी केली. पण, तरीही भारताला सामन्यावर पकड बनवता आली नाही. कर्णधार टेम्बा बवुमा व हेनरीच क्लासेन यांनी भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी वाढवली. या जोडीने हळुहळू पेस वाढवला अन् हार्दिक पांड्याने टाकलेल्या ११ व्या षटकात १३, तर अक्षर पटेलने टाकलेल्या १२ व्या षटकात १९ धावा चोपल्या. १३व्या षटकात युजवेंद्र चहलचा पहिला चेंडू बवुमाने चौकार खेचला, परंतु पुढील चेंडूवर चहलने त्याचा त्रिफळा उडवला. टेम्बाच्या ( ३५) बाद होणाऱ्या क्लासेनसोबत त्याची ४१ चेंडूंवरील ६४ धावांची भागीदारी संपुष्टात आली.
पुढच्याच चेंडूवर डेव्हिड मिलरच्या बॅटला लागून चेंडू वेगाने पहिल्या स्लिपच्या दिशेनं गेला. तिथे उभ्या असलेल्या दिनेश कार्तिकला तो चेंडू टिपता आला नाही. पहिल्या १२ चेंडूंत ४ धावा करणाऱ्या क्लासेनने पुढील २० चेंडूंत ४६ धावा कुटल्या. त्याने ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केल्या. आफ्रिकेला शेवटच्या ६ षटकांत ४१ धावा करायच्या होत्या. चहलने टाकलेल्या १६व्या षटकात क्लासेनने २३ धावा कुटल्या आणि सामना एकतर्फी केला. विजयासाठी ५ धावा हव्या असताना हर्षल पटेलने क्लासेनला बाद केले. क्लासेन ४६ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह ८१ धावांत माघारी परतला. त्याने चौकार-षटकारांनी १२ चेंडूंत ५८ धावा चोपल्या. भुवीने आणखी एक विकेट घेताना ड्वेन पार्नेलचा ( १) त्रिफळा उडवला. भुवीने १३ धावांत ४ विकेट्स घेतल्या. आफ्रिकेने १८.२ षटकांत ६ बाद १४९ धावा करून विजय पक्का केला.