India vs South Africa 2nd T20I Live Updates : भारतीय संघाला दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यातही दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. आफ्रिकेने १४९ धावांचे लक्ष्य १८.२ षटकांत ६ विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. भुवनेश्वर कुमारने पॉवरप्लेमध्ये तीन विकेट्स घेऊन आफ्रिकेची अवस्था ३ बाद २९ अशी केली होती. तरीही आफ्रिकेने हा विजय खेचून आणला. या विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार रिषभ पंत ( Rishabh Pant) याने फलंदाजावर खापर फोडले. या पराभवासह कर्णधारपदातील पहिली दोन सामने गमावणारा तो पहिलाच भारतीय कर्णधार ठरला.
गोलंदाजांसाठी पोषक असलेल्या खेळपट्टीचा आफ्रिकेच्या गोलंदाजांनी पुरेपूर फायदा उचलला. इशान किशन ( ३४) , श्रेयस अय्यर ( ४०) आणि दिनेश कार्तिक ( ३०*) हे तिघे वगळल्यास भारतीय फलंदाज आज अपयशी ठरले. रिषभ पंत चुकीचा फटका मारून बाद झाला, तर हार्दिक पांड्याचा भन्नाट चेंडूवर त्रिफळा उडाला. कार्तिकने अखेरच्या ५ चेंडूंत २१ धावा केल्या म्हणून भारताने ६ बाद १४८ धावांपर्यंत मजल मारली.
प्रत्युत्तरात आफ्रिकेची सुरुवात भारतापेक्षा खराब झाली. त्यांचे तीन फलंदाज २९ धावांत माघारी परतले.
कर्णधार रिषभ पंतने पॉवर प्लेमध्ये अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारकडून ३ षटकं टाकून घेतली आणि त्याने त्याचा विश्वास सार्थ ठरवला. पण, पुढील १४ षटकांचे नियोजन करण्यात रिषभ चुकला. कर्णधार टेम्बा बवुमा व क्लासेन यांनी चौथ्या विकेटसाठी ४१ चेंडूंत ६४ धावा जोडून आफ्रिकेला पुनरागमन करून दिले. त्यानंतर क्लासेन व डेव्हिड मिलर यांनी २८ चेंडूंत ५१ धावा चोपल्या. क्लासेन ४६ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह ८१ धावांत माघारी परतला. भुवीने १३ धावांत ४ विकेट्स घेतल्या. आफ्रिकेने १८.२ षटकांत ६ बाद १४९ धावा करून विजय पक्का केला.
रिषभ पंत म्हणाला,''फलंदाजीत आम्ही १०-१५ धावा कमी केल्या. भुवनेश्वर कुमार आणि अन्य जलदगती गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. सामन्याच्या दुसऱ्या टप्प्यात आम्ही अपयशी ठरलो. गोष्टी आमच्या बाजूने घडल्याच नाहीत. गोलंदाजांनी सुरुवात चांगली केली, परंतु १०-११ व्या षटकानंतर आम्हाला सातत्यपूर्ण गोलंदाजी करता आली नाही. तिथेच सामना पलटला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांप्रमाणे आम्ही कामगिरी करून दाखवू, असे आम्हाला वाटले. फिरकीपटूंनी अजून चांगली कामगिरी करायला हवी.. आम्ही अखेरचे तीन सामने जिंकण्याचा प्रयत्न करू.''
Web Title: IND vs SA 2nd T20I Live Updates : I think batting, we were 10-15 runs short. Bhuvi and all other fast bowlers though bowled very well, Say Rishabh Pant
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.