India vs South Africa, 2nd T20I Live Updates : भारताच्या आघाडीच्या चार फलंदाजांनी आज वादळी खेळी केली. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या सामन्यात वादळी पाऊस येईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण, इथे भारतीय फलंदाजांनी धावांचे वादळ आणले. रोहित शर्मा व लोकेश राहुल यांच्या ९६ धावांच्या सलामीनंतर सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) व विराट कोहली यांनी शतकी धावा जोडल्या. सूर्याने तर अक्षरशः कहर करताना आफ्रिकन खेळाडूंना रडकुंडीला आणले.
फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादवने आफ्रिकेच्या गोलंदाजांना कुटून काढले. त्याने कागिसो रबाडाच्या एका षटकात २२ धावा चोपल्या आणि ट्वेंटी-२०त १००० धावा पूर्ण केल्या. सर्वात कमी चेंडूंत १००० धावा करण्याचा विक्रमही त्याने नावावर केला. सूर्याने ५७३ चेंडूंत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त १००० + धावा करताना ग्लेन मॅक्सवेलचा ( ६०४) व कॉलिन मुन्रोचा ( ६३५) विक्रम मोडला. त्याने भारतीयांमध्ये सर्वात कमी डावात हा टप्पा ओलांडण्याचा विक्रमात रोहितला मागे टाकले. त्याने ५ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने १८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. सूर्या व विराट यानी ४२ चेंडूंत १०२ धावांची भागीदारी केली. १९व्या षटकात सूर्या रन आऊट झाला. त्याने २२ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांसह ६१ धावांची वादळी खेळी केली.
दिनेश कार्तिकने अखेरच्या षटकात तुफान फटकेबाजी केली, परंतु विराटला २८ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ४९ धावांवर नाबाद राहावे लागले. कार्तिकने ७ चेंडूंत १७ धावा करताना भारताला ३ बाद २३७ धावांचा पल्ला गाठून दिला. आफ्रिकेविरुद्धची ही भारताची ट्वेंटी-२०तील सर्वोत्तम धावसंख्या ठरली.