India vs South Africa 2nd T20I Live Updates : इशान किशनने पुन्हा एकदा चांगली सुरुवात करून दिली. पण, अन्य फलंदाजांनी निराशाजनक कामगिरीचा कित्ता गिरवला. ऋतुराज गायकवाड, कर्णधार रिषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांना एकेरी धावसंख्येवर माघारी परतावे लागले. श्रेयस अय्यरने दमदार खेळ केला, परंतु दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. रिषभ व्हाईड बॉलवर फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला, तर हार्दिकचा उडालेला त्रिफळा पाहून प्रेक्षकांना धक्का बसला.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा याने नाणेफेक जिंकून पुन्हा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. क्विंटन डी कॉकला हाताच्या दुखापतीमुळे आजच्या सामन्यात खेळता येणार नाही, तर त्रिस्तान स्टुब्ब्सलाही आज बाकावर बसवण्यात आले आहे. त्यांच्या जागी रिझा हेड्रीक्स व हेनरीच क्लासेन हे आफ्रिकेच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार आहेत. भारतीय संघात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. उम्रान मलिकचे पदार्पण पुन्हा लांबणीवर पडले आहे.
भारताला पहिल्या षटकात धक्का, कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर सलामीवीर ऋतुराज गायकवाड ( १) झेलबाद झाला. कागिसो रबाडाची ही आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील पन्नासावी विकेट ठरली. ट्वेंटी-२०त आफ्रिकेकडून डेल स्टेन ( ६४), इम्रान ताहीर ( ६१) व तब्रेझ शम्सी ( ५७) यांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. पहिल्या षटकात धक्का बसल्यानंतरही इशान किशन आक्रमक पवित्र्यातच दिसला. त्याने एनरिच नॉर्खियाने टाकलेल्या चौथ्या षटकात दोन दमदार षटकार खेचले. ६व्या षटकात इशानन मिड ऑनच्या दिशेने खणखणीत फटका मारला अन् चेंडू टिपण्यासाठी वेन पार्नेल हवेत झेपावला. पण, शर्थीचे प्रयत्न करूनही पार्नेलकडून झेल सुटला अन् इशानला २८ धावांवर जीवदान मिळाले. पण, पुढच्याच षटकात तो झेलबाद झाला. नॉर्खियाच्या आखुड चेंडूवर इशानन पुल शॉट मारला अन् रॅसी व्हॅन डेर ड्यूसेनने डिप स्क्वेअर लेगला सहज झेल घेतला. इशान २१ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३४ धावांवर बाद झाला.
त्यानंतर श्रेयस अय्यरने मोर्चा सांभाळला. तब्रेझ शम्सीच्या पहिल्याच षटकात त्याने १४ धावा कुटल्या. पण, कर्णधार रिषभ पंत पुन्हा एकदा चूकीचा फटका मारून माघारी परतला. केशव महाराजने त्याला ( ५) बाद केले. भारताच्या १० षटकांत ३ बाद ७१ धावा झाल्या होत्या. १३व्या षटकात ३७ धावांवर अय्यरला जीवदान मिळाले. पण, पार्नेलने त्याच षटकात हार्दिक पांड्याचा ( ९) त्रिफळा उडवला. त्यापुढील षटकात ड्वेन प्रेटोरियसने अय्यरला ४० धावांवर झेलबाद केले. भारताचा निम्मा संघ ९८ धावांवर माघारी परतला.
Web Title: IND vs SA 2nd T20I Live Updates : Wayne Parnell castles Hardik Pandya for 9, Shreyas Iyer departs for 40, India 5 down for 98, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.