India vs South Africa 2nd T20I Marathi Updates : रिंकू सिंगने ( Rinku Singh) त्याची ट्वेंटी-२० संघातील निवड आजही सार्थ ठरवली... शुबमन गिल व यशस्वी जैस्वाल शून्यावर माघारी परतल्यानंतर तिलक वर्माने आक्रमक फटकेबाजी करून दक्षिण आफ्रिकेला बॅकफूटवर फेकले. त्यानंतर सूर्यकुमार यादव व रिंकू सिंग यांनी अर्धशतक झळकावले. कर्णधार सूर्या माघारी परतल्यानंतर रिंकूने सूत्र हाती घेतली आणि आफ्रिकेच्या गोलंदाजांना चोपून काढले. त्याने आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्कराम याच्या गोलंदाजीवर मारलेल्या षटकाराने समोरील प्रेस बॉक्सची काच तोडली.
तिलक वर्माने तिसऱ्या विकेटसाठी सूर्यकुमारसह २४ चेंडूंत ४९ धावांची भागीदारी केली. तिलक २० चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह २९ धावांवर बाद झाला सूर्यासोबत रिंकू सिंगने ४८ चेंडूंत ७० धावा जोडल्या. सूर्यकुमार ३६ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५६ धावांवर झेलबाद झाला. रवींद्र जडेजा १४ चेंडूंत १९ धावांवर बाद झाला, परंतु रिंकूसह त्याने ३८ धावा जोडल्या. गेराल्ड कोएत्झीने सलग दुसऱ्या चेंडूवर अर्शदीप सिंगला माघारी पाठवले. १९.३ षटकांनंतर पाऊस सुरू झाला आणि सामना थांबवण्यात आला. भारताने ७ बाद १८० धावा केल्या आहेत.
रिंकू ३९ चेंडू ९ चौकार व २ षटकारांसह ६८ धावांवर नाबाद आहे. १९व्या षटकात मार्करमला रिंकूने सलग दोन षटकार खेचले.