India vs South Africa 2nd T20I Marathi Updates : पावसामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर १५ षटकांत १५२ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवले गेले. यजमान आफ्रिकेच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांचा पहिल्या दोन षटकांत चांगलाच समाचार घेतला.
सलामीवीरांच्या अपयशानंतर तिलक वर्माने ( २९) आक्रमक फटकेबाजी करून सूर्यकुमारसह २४ चेंडूंत ४९ धावांची भागीदारी केली आणि संघाला सावरले. सूर्यकुमार व रिंकू सिंग यांनी ४८ चेंडूंत ७० धावा जोडल्या. सूर्यकुमार ३६ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५६ धावांवर झेलबाद झाला. रवींद्र जडेजा १४ चेंडूंत १९ धावांवर बाद झाला, परंतु रिंकूसह त्याने ३८ धावा जोडल्या. १९.३ षटकांनंतर पाऊस सुरू झाला आणि सामना थांबवण्यात आला. भारताने ७ बाद १८० धावा केल्या. पावसामुळे बराच वेळ वाया गेल्याने षटकांची संख्या १५ करण्यात आली आहे आणि दक्षिण आफ्रिकेला १५ षटकांत १५२ धावांचे ठेवले गेले. रिंकूने ३९ चेंडू ९ चौकार व २ षटकारांसह नाबाद ६८ धावा केल्या.
रिझा हेंड्रीक्स व मॅथ्यू ब्रेत्टकी यांनी आफ्रिकेला आक्रमक सुरुवात करून दिली. मोहम्मद सिराजच्या पहिल्याच षटकात दोघांनी १४ धावा कुटल्या. अर्शदीप सिंगच्या एका षटकात २४ धावा चोपून आफ्रिकेने दोन षटकांतच ३८ धावा उभ्या केल्या. सूर्याने तिसऱ्या षटकात अनुभवी गोलंदाज रवींद्र जडेजाला गोलंदाजीला आणले. त्याच्या षटकातील पाचव्या चेंडूवर हेंड्रीक्स व ब्रेत्टकी यांच्यातला ताळमेळ चूकला. हेंड्रीक्स दुसऱ्या धावेसाठी नकार देत असतानाही ब्रेत्टकी धावला अन् ७ चेंडूंत १६ धावांवर रन आऊट झाला. तिलक वर्माने चेंडू रवींद्र जडेजाकडे दिला, जडेजाने लगेच तो यष्टिरक्षक जितेश शर्माकडे फेकला अन् भारताला यश मिळाले.