India vs South Africa 2nd T20I Marathi Updates : सूर्यकुमार यादवने कॅप्टन्स इनिंग्ज खेळताना टीम इंडियाचा गडगडलेला डाव सावरला. दोन्ही सलामीवीर भोपळ्यावर माघारी परतल्यानंतर तिलक वर्माने भारताची गाडी रुळावर आणली. त्याच्या फटकेबाजीनंतर सूर्याने अर्धशतक झळकावून विक्रमांना गवसणी घातली. त्यानंतर रिंकू सिंग ( Rinku Singh) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले अर्धशतक झळकावले.
भारताचे दोन्ही सलामीवीर शुबमन गिल व यशस्वी जैस्वाल भोपळ्यावर माघारी परतल्यानंतर तिलक वर्माने दक्षिण आफ्रिकेला झोडून काढले. २०१६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध रोहित शर्मा व अजिंक्य रहाणे हे दोन्ही सलामीवीर शून्यावर बाद झाले होते. तिलक वर्माने आक्रमक फटकेबाजी करताना मार्को यानसेनच्या एका षटकात १९ धावा कुटल्या. त्याने कर्णधार सूर्यकुमारसह २४ चेंडूंत ४९ धावांची भागीदारी केली. गेराल्ड कोएत्झीने ही जोडी तोडली. तिलक २० चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह २९ धावांवर बाद झाला. तिलकच्या विकेटनंतर भारताच्या धावांचा वेग काहीसा मंदावला होता, परंतु सूर्याचे खेळपट्टीवर असणे आश्वासक होते. त्याने २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. भारताकडून आफ्रिकेत ट्वेंटी-२०त अर्धशतक झळकावणारा तो पहिला कर्णधार ठरला.