भारतीय क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिला सामना पावसामुळे होऊ शकला नव्हता. तर दुसऱ्या सामन्यामध्येही पावसाने वारंवाळ अडथळा आणला. पण डकवर्थ लुईस नियमानुसार सामन्याचा निकाल लागला. मात्र या सामन्यात मोठी धावसंख्या उभारल्यानंतरही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने संघाच्या पराभवाचं नेमकं कारण सांगितलं आहे. सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘’दक्षिण आफ्रिकेने सुरुवातीच्या ५-६ षटकांतच आमच्या हातून सामना हिसकावला. पहिला डाव संपल्यावर मला ही समाधानकारक धावसंख्या वाटली होती. मात्र नंतर सगळं उलटंच घडलं’’. आता ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या संघानं १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हा गुरुवार १४ डिसेंबर रोजी खेळला जाणार आहे.
भारताच्या डावातील शेवटच्या षटकात पावसामुळे खेळ थांबला. त्यावेळी संघाची धावसंख्या १९.३ षटकांत ७ बाद १८० अशी झाली होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १५ षटकांमध्ये १५२ धावांचं सुधारित लक्ष्य देण्यात आलं. मात्र हे आव्हान त्यांनी ७ चेंडू आणि ५ गडी राखून पार केले. दक्षिण आफ्रिकेकडून रीझा हेंड्रिक्सने २७ चेंडूत ४९ धावांची भागीदारी करताना मॅथ्यू ब्रिट्झके आणि एडन मार्क्रमसोबत महत्त्वपूर्ण भागीदाऱ्या करत संघाचा विजय निश्चित केला.
पराभवाचं विश्लेषण करताना सूर्यकुमार यादव म्हणाला की, आम्हाला ही पुरेशी धावसंख्या आहे, असं वाटलं होतं. मात्र त्यांनी सुरुवातीच्या ५-६ षटकांमध्ये जबरदस्त फलंदाजी केली आणि सामन्याचे पारडे फिरवले. खेळपट्टीवर जा आणि मुक्तपणे फटकेबाजी करा, हा क्रिकेटचा तो ब्रँड आहे ज्याबाबत आम्ही बोलत होतो. पावसामुळे मैदान ओले झाल्याने गोलंदाजांसाठी परिस्थिती खूप आव्हानात्मक बनली होती, त्याचा दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी पुरेपूर फायदा घेतला.
सूर्यकुमार यादव पुढे म्हणाला की, ओल्या चेंडूसोबत या धावसंख्येचा बचाव करणं कठीण होतं. भविष्यात आम्हाला अशा परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. ही आमच्यासाठी चांगली शिकवण आहे. आता आम्ही तिसऱ्या टी-२० सामन्याची वाट पाहत आहोत, असे सूर्यकुमार यादवने सांगितले.
Web Title: Ind Vs SA 2nd T20I: 'We lost the match there...' skipper Suryakumar Yadav explains the reason for defeat
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.