IND vs SA 2nd Test (Marathi News) : भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका रोमहर्षक वळणावर आली आहे. पहिल्या दिवशी २३ विकेट्स पडल्यानंतर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहने यजमानांना धक्के दिले. जसप्रीतने डावात ५ विकेट्स घेत भारताला पुनरागमन करून दिले, परंतु एडन मार्कराम शड्डू ठोकून उभा राहिला. त्याच्या शतकी खेळीने सर्व गणित बदलले होते. मात्र, मोहम्मद सिराजने ही महत्त्वाची विकेट मिळवून दिली आणि मॅच फिरली.
आफ्रिकेचा पहिला डाव ५५ धावांवर गडगडला. मोहम्मद सिराजने १५ धावांत ६ विकेट्स घेतल्या आमि त्याला जसप्रीत बुमराह व मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत उत्तम साथ दिली. भारताकडून रोहित शर्मा ( ३९), शुबमन गिल ( ३६) व विराट कोहली ( ४६) वगळता अन्य फलंदाजांनी निराश केले. भारताचे तळाचे ६ फलंदाज एकही धाव न करता माघारी परतले आणि पहिला डाव १५३ धावांवर गडगडला. कालच्या ३ बाद ६२ धावांवरून सुरुवात करणाऱ्या आफ्रिकेला दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात जसप्रीत बुमराहने धक्का दिला आणि डेव्हिड बेडिंगहॅम ( ११) झेलबाद झाला. बुमराहने त्यानंतर कायले वेरेयने ( ९), मार्को यानसेन ( ११) आणि केशव महाराज ( ३) यांना बाद करून आफ्रिकेची अवस्था ७ बाद १११ अशी दयनीय केली.
पण, एडन मार्करम उभा राहिला. जसप्रीतच्या गोलंदाजीवर ७४ धावांवर मार्करमचा सोपा झेल लोकेश राहुलने टाकला. त्यानंतर मार्करमने पुढच्या षटकात प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर २० धावा चोपल्या. त्याने ९९ चेंडूंत शतक पूर्ण करून आफ्रिकेला आशेचा किरण दाखवला. त्याची विकेट मिळवण्यासाठी रोहितने पहिल्या डावातील स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजला आणले. सिराजच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मार्करम बाद झाला. रोहितने झेल घेताच चेंडू रागाने जमिनिवर आपटला. मार्करमने १०३ चेंडूंत १७ चौकार व २ षटकारांनी १०६ धावा केल्या. कागिसो रबाडाला ( २) कृष्णाने बाद करून नववा धक्का दिला. बुमराहने शेवटची विकेट घेत आफ्रिकेचा दुसरा डाव १७६ धावांवर गुंडाळला. भारतासमोर विजयासाठी ७९ धावांचे आव्हान आहे आणि बुमराहने ६१ धावा देत ६ विकेट्स घेतल्या.
Web Title: IND vs SA 2nd Test : HUNDRED BY AIDEN MARKRAM ( 106), JASPRIT BUMRAH ( 6/61 ), India needs 79 runs to create history at Capetown.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.