IND vs SA, 2nd Test : भारतीय संघाला जोहान्सबर्ग कसोटीत विराट कोहलीच्या आक्रमक वृत्तीचा सर्वाधिक उणीव जाणवली. जोहान्सबर्गच्या खेळपट्टीवर २४० धावांचे लक्ष्य ही अवघड गोष्ट होती. पण, कर्णधार डीन एल्गनं दमदार खेळ करताना भारताला ७ विकेट्सनं पराभूत केलं. शॉन पोलॉकपासून अनेकांनी विराटचे नसणे भारताला महागात पडल्याचा दावा केला. क्षेत्ररक्षण करताना विराटचा जो आक्रमकपणा असतो तो लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियात दिसला नाही. पण, याचवेळी विराट नसताना टीम इंडियाच्या कसोटी संघाची जबाबदारी अजिंक्य रहाणेकडे ( Ajinkya Rahane) सोपवायला हवी होती, असे मत भारताचा माजी सलामीवर वासिम जाफर ( Wasim Jaffer) यानं व्यक्त केले.
सामन्यात नेमकं काय झालं? भारताच्या पहिल्या डावातील २०२ धावांच्या प्रत्युत्तरात यजमान आफ्रिकेनं २२९ धावा केल्या. शार्दूल ठाकूरनं ६१ धावांत ७ विकेट्स घेत आफ्रिकेला मोठी आघाडी घेऊ दिली नाही. पण, दुसऱ्या डावात भारतालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांची अर्धशतकी खेळी अन् हनुमा विहारीच्या नाबाद ४० धावांच्या जोरावर भारतानं २ ६६ धावा करून आफ्रिकेसमोर २४० धावांचे लक्ष्य ठेवले. तिसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत डीन एल्गरनं खिंड लढवत आफ्रिकेला २ बाद ११८ धावा उभारून दिल्या. चौथ्या दिवशी पावसामुळे साडेपाच तासांचा खेळ वाया गेला. त्यानंतर ३४ षटकांच्या डावात आफ्रिकेनं ७ विकेट्स राखून विजय मिळवत इतिहास घडवला.
जोहान्सबर्गवर भारताचा हा पहिलाच कसोटी पराभव ठरला. यापूर्वी झालेल्या पाच सामन्यांत भारतानं दोन विजय मिळवले होते, तर तीन सामने ड्रॉ केले होते. राहुल द्रविड व विराट कोहली यांच्या नेतृत्वाखाली हे दोन्ही विजय आले होते. आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर १८८ चेंडूंचा सामना करताना १० चौकारांच्या मदतीनं ९६ धावांवर नाबाद राहिला. एडन मार्कराम ( ३१), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( ४०), किगन पीटरसन ( २८) आणि टेम्बा बवुमा ( २३*) यांनी योगदान दिलं.