IND vs SA 2nd Test (Marathi News) : भारतीय संघाने केप टाऊन कसोटी दीड दिवसांत जिंकली. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी ठेवलेले ७९ धावांचे लक्ष्य भारताने ७ विकेट्स राखून पार केले आणि मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. महेंद्रसिंग धोनीनंतर दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकात १-१ अशी बरोबरीत सोडवणारा रोहित शर्मा हा भारताचा दुसरा कर्णधार ठरला. पण, केप टाऊनमध्ये कसोटी जिंकणारा तो पहिला आशियाई कर्णधार ठरला.
मोहम्मद सिराज ( १५-६) व जसप्रीत बुमराह ( ६-६१) यांनी अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या डावात उल्लेखनीय मारा करून विजयाचा पाया रचला. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ५५ धावांवर आणि दुसरा डाव १७८ धावांवर भारतीय गोलंदाजांनी गुंडाळला. दुसऱ्या डावात त्याच्यांकडून एडन मार्करमने शतकी खेळी केली. भारताकडून पहिल्या डावात रोहित शर्मा ( ३९), शुबमन गिल ( ३६) व विराट कोहली ( ४६) वगळल्यास अन्य फलंदाज अपयशी ठरले. भारताचा पहिला डाव १५३ असा गडगडला आणि ९८ धावांच्या आघाडीवर समाधान मानावे लागले. भारताकडून दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल ( २८), विराट कोहली ( १२), शुबमन गिल ( १०) व रोहित शर्मा ( नाबाद १७) यांनी हातभार लावला.