केपटाउन: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना अनेक कारणांनी गाजला. केवळ पाच सत्रात संपलेला हा पहिला कसोटी सामना ठरला आहे. दुसरा सामना जिंकून पाहुण्या भारतीय संघाने मालिका १-१ अशी बरोबरीत संपवली. या मालिकेनंतर भारत मायदेशात अफगाणिस्तानविरूद्ध तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. सामना जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत बोलताना विविध बाबींवर प्रकाश टाकला. यावेळी अफगाणिस्तानविरूद्धच्या मालिकेबद्दल प्रश्न विचारला असता हिटमॅनने उत्तर देणे टाळले.
खेळपट्टीवरून रोहितची बोचरी टीका
अलीकडेच भारतात वन डे विश्वचषक पार पडला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमानांना नमवून विश्वचषक उंचावला. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. याचाच दाखला देत रोहित शर्माने सांगितले की, विश्वचषक २०२३ च्या फायनलची खेळपट्टी सरासरीपेक्षा कमी मानली गेली होती, तरीही ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाने तिथे शतक झळकावले होते. मी मॅच रेफ्रींना विनंती करतो की, ज्या देशात हा सामना खेळला गेला तिथे काय नाही ते पाहा. भारतातील खेळपट्टीवरील धुळीबद्दल बोलायचे झाले तर, येथील न्यूलँड्सच्या खेळपट्टीवरही भेगा पडल्या होत्या. सर्वांना माहिती आहे दुसऱ्या कसोटीमध्ये काय झालं. जोपर्यंत तुम्ही तोंड बंद ठेवाल तोपर्यंत मला खेळपट्टीचा कोणताच त्रास होत नाही. २०२३ च्या विश्वचषक फायनलमध्ये एका खेळाडूने शतक केले आणि ती खेळपट्टी खराब घोषित करण्यात आली. त्यामुळे मला वाटते की, देशाच्या आधारावर नाही तर खेळपट्टीच्या आधारावर रेटिंग द्यायला हवी.
भारताची मालिकेत बरोबरी
दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून रोहितसेनेने मालिका बरोबरीत संपवली. अवघ्या दीड दिवसात सामना जिंकून मालिका बरोबरीत संपवण्याचे आव्हान भारतीय संघाने पूर्ण केले. सामन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच बुधवारी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेला केवळ ५५ धावा करता आल्या. मोहम्मद सिराजचे वादळ आले अन् यजमान संघ धुवून निघाला. प्रत्युत्तरात, भारताने आपल्या पहिल्या डावात १५३ धावा करून ९८ धावांची आघाडी घेतली. दिवसाच्या तिसऱ्या सत्रात दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी आपल्या दुसऱ्या डावात ३ गडी गमावून ६२ धावा केल्या होत्या. आफ्रिकेचा संघ आपल्या दुसऱ्या डावात १७६ धावांत आटोपला. एडम मार्करमच्या (१०६) शतकी खेळीच्या जोरावर आफ्रिकेने १५० पार धावसंख्या नेली. भारताकडे ९८ धावांची आघाडी असल्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी केवळ ७९ धावांची गरज होती. भारताकडून दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल (२८), विराट कोहली (१२), शुबमन गिल (१०) व रोहित शर्मा (नाबाद १७) यांनी हातभार लावला अन् भारताने १२ षटकांत ३ बाद ८० धावा करून विजय मिळवला.
Web Title: IND vs SA 2nd Test Indian team captain Rohit Sharma has criticized the ICC over the pitch poor rating in the World Cup Final 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.